ठाणे: दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा ( भांगरे ) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले. माजी आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी प्रांगणातील तारपाधारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी संस्कृतीची ओळख सांगणारे तारपा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या चौकात देखील कार्यक्रम पार पडला.
ठाणे आणि पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर,म-ठाकूर, ई. आदिवासी जमातीचे बांधव गुण्यागोविंदाने राहतात. आदिवासी जिल्ह्यातील ओळख व आदिवासी संस्कृतीचे प्रतिक म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपाधारी अर्ध पुतळा उभारण्यात आलेला आहे. याप्रसंगी आदिवासी वारली समाज सेवा मंडळ अध्यक्ष दत्तात्रय भुयाळ, हंसराज खेवरा, दत्ता भुयार, भाऊसाहेब गंभीरे, गणेश वाघे, सुनील तुकाराम भांगरे यांनी सहभाग घेतला.