महत्वाचे…
१.पवई येथील करुणानगर भागात राहणारा रितेश सिंह हा रविवारपासून बेपत्ता होता.२. भाईंदर पूर्व येथील न्यू गोल्डन नेस्ट संकुलाच्या मागील बाजूने घेतला मृतदेह ताब्यात ३. दोन आरोपींना अटक
भाईंदर : मुंबईतल्या पवई येथील नऊ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची भाईंदर येथे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भाईंदर पूर्व येथील न्यू गोल्डन नेस्ट संकुलाच्या मागील बाजूला असलेल्या झुडपातून या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पवई येथील करुणानगर भागात राहणारा रितेश सिंह हा रविवारपासून बेपत्ता होता. त्याच्या पालकांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तपासाअंती रितेश याच्या वडिलांच्या नात्यात असलेल्या अमर सिंह आणि त्याचा सहकारी लालू सिंह यांनी रितेशचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची भाईंदर येथे हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अमर सिंह हा रितेशच्या वडिलांच्या जवळच्या नात्यातला होता आणि दोघेही उत्तर प्रदेश येथील एकाच गावातील रहिवासी होते. रितेश राहात असलेल्या भागात अमर सिंह आणि लालू सिंह यांचा लोखंडी ग्रिल बनवण्याचा व्यवसाय होता. अमरचे नेहमी रितेशच्या घरी जाणे-येणे असायचे. रितेशही अनेक वेळा त्यांच्या दुकानात जायचा. रविवारी सकाळी तो या दुकानात गेला होता, परंतु सायंकाळ झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी अमरला मोबाइलवर फोन केला असता रितेश दुपारीच दुकानातून घरी गेला असून आपण आता कामासाठी भाईंदरला आल्याचे त्याने सांगितले. ही बाब रितेशच्या वडिलांनी पवई पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांचा पहिला संशय अमर सिंह आणि लालू सिंह यांच्यावरच केंद्रित झाला.
पोलिसांनी मग अमर सिंह याला फोन करून पोलीस ठाण्यात यायला सांगितले. या वेळी रितेश त्यांच्या सोबतच भाईंदरमध्ये होता. अमर याच्या नात्यातील एक जण भाईंदरमध्ये राहतो त्याच्याकडे आरोपी आले होते. अपहरण केल्यानंतर रितेशच्या वडिलांना खंडणीसाठी फोन करायचा त्यांचा बेत होता. परंतु पोलिसांचे सारखे फोन यायला लागल्यानंतर पैसे मागण्याचा बेत त्यांनी रद्द केला. सोमवारी दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना आपला खाक्या दाखवताच त्यांनी रात्री उशिरा रितेशची हत्या केल्याचे कबूल केले.