skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रकामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा- विखे पाटील

कामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा- विखे पाटील

मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातून प्रवाशांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना तोंड द्याव्या लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरकारने हा मुद्दा अधिक प्रतिष्ठेचा न करता तातडीने सामोपचाराची भूमिका घ्यावी, असे विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याच्या अनुषंगाने ते पुढे म्हणाले की, परिवहन खात्याचे मंत्री हेच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. सरकारमध्ये राहून सवंग लोकप्रियतेसाठी विरोध करणे सोपे असते. मात्र सरकार म्हणून जबाबदारी निभावणे किती कठिण असते, याची प्रचिती आता शिवसेनेला येत असेल. हे खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपने जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, अशीही शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये असलेल्या विसंवादातून वेगवेगळ्या स्तरावर सातत्याने शह-काटशहाचे राजकारण खेळले जात असून, त्याचेच पडसाद एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उमटले असण्याची शक्यताही विखे पाटील यांनी वर्तवली. सरकार म्हणून शिवसेना सर्वसामान्य प्रवाशांच्या बाजूने असेल तर तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा. अन्यथा सरकारमधील जबाबदारी पार पाडता येत नाही म्हणून सत्तेतून बाजुला व्हावे, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments