पुणे : फसलेली कर्जमाफी योजना, दिखाऊ स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजनेचा उडालेला बोजवारा, निधीअभावी रखडलेली संसद दत्तक ग्राम योजना यामुळे हे तर जुमले की सरकार आहे अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र सरकारच्या ३ वर्षांच्या कारभारावर टीका केली.
पुणे पालिकेत जी गावं समाविष्ट करण्यात येत आहेत. त्या गावांच्या प्रश्नांबाबत सुळे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीची घोषणा हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे अशीही त्यांनी टीका केली. तर सरकारने मोठ्या प्रमाणात फक्त जाहीरातींवरच खर्च केलाय तर प्रत्यक्षात मात्र त्यानुसार काही काम झाल्याचं दिसत नाही असंही त्या म्हणाल्या.
तसंच राहुल गांधी यांच्यासोबत आपण १० वर्ष एकत्र काम केल्याने ओळखतो, आम्ही चांगले मित्र आहोत असंही सुप्रिया म्हणाल्या. राहुल यांच्या नेतृत्वाखाली यूपीएसोबत आगामी निवडणूक लढणार का किंवा नारायण राणे ना मंत्रिमंडळ विस्तारत स्थान दिलं आणि शिवसेना बाहेर पडली तर राष्ट्रवादी राजकीय स्थैर्य राहावं म्हणून भाजपला पाठिंबा देणार का ? असा प्रश्न विचारला असता हे धोरणाचे भाग आहेत. याबद्दल पक्ष श्रेष्ठी ठरवतील असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.