मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्काच्या धुळवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय पिचकारीतून शरसंधान साधलं आहे. पवार-शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी देखील काही पत्रकार त्याबाबत रंग उधळत आहेत. चघळायला काही नसेल तर अफवेभोवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीने सिद्ध झाले आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय पिचकारीतून शरसंधान साधलं आहे. पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही हे आवाहन केलं आहे. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत.
चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2021
अर्ध्या तासात राऊतांचं घुमजाव
अर्ध्या तासापूर्वीच राऊत यांनी पवार-शहा यांच्या भेटीवर भाष्य केलं होतं. पवार-शहांची भेट झाली तर चूक काय? भेट झाली तर होऊ द्या. कामानिमित्त भेट झाली असेल तर चूक काय?, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच राऊत यांनी नवं ट्विट करून या भेटीच्या चर्चेचा रंगलेला फुगा फोडला आहे.
राऊत काय म्हणाले होते?
पवार-शहांची भेट झाली असेल तर होऊ दे. बंद खोलीतील मुद्दे बाहेर येतात. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या, असं राऊत यांनी सांगितलं. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे. दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं, असं राऊत म्हणाले होते.
चंद्रकांतदादांची धुळवड
यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही या भेटीवर भाष्य करून राजकीय धुळवड उडवून दिली होती. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल यावेळी त्यांना करण्यात आलं. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अंदाज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. तुमच्याकडूनही हेच अंदाज समजत आहेत. परंतु जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा पहाटेच्या शपथविधीसारखं नंतर कळेल, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा धुरळा उडवून दिला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विट केलं असल्याचं सांगितलं जात आहे.