Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रफोन टॅपिंग अहवाल भिजलेला लवंगी फटाका; संजय राऊतांचा टोला

फोन टॅपिंग अहवाल भिजलेला लवंगी फटाका; संजय राऊतांचा टोला

विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार

Rokhthok mp sanjay raut saamana editor shivsena leader
Rokhthok mp sanjay raut saamana editor shivsena leader

नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावला आहे. अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. “दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही.

विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले.

दिल्लीत अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करतायत याकडे आम्ही पाहतोय,” असंही संजय राऊत म्हणाले.

“ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन सगळा गोंधळ सुरु आहे त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सीबीआय चौकशीसाठी येथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्रं अनेक राज्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“राज्यपाल हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. फडणवीसांनी राज्यपालांना भेटणं घरची गोष्ट आहे. त्या पदाचा मान तिथे बसणाऱ्या व्यक्तीने ठेवला पाहिजे. राज्यपालांना पदाचा आदर असेल तर त्यांना घटनेत राहून काम केलं पाहिजे.

अजूनही आमच्या १२ सदस्यांना मंजुरी का दिली नाही? कारण भाजपाची तशी इच्छा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यपालांना भेटण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना भेटा, राज्यपाल सरकार चालवतात का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी विचारला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments