Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडानांदेडपुतणीच्या लग्नासाठी वऱ्हाडाला बोलाविण्यास गेलेल्या काकाचा विहिरीत पडून मृत्यू

पुतणीच्या लग्नासाठी वऱ्हाडाला बोलाविण्यास गेलेल्या काकाचा विहिरीत पडून मृत्यू

Deathमहत्वाचे….

  • लग्नासाठी सर्वांनी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले होते
  • अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला
  • ही घटना हदगाव तालुक्यातील कवाणा येथे घडली

नांदेड : भावाच्या मृत्यूनंतर जिच्या आनंदासाठी कष्ट घेतले, त्या पुतणीचे आज लग्न. या आनंदाच्या क्षणात सारे गावच वऱ्हाडी होते, सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कवाणा येथे घडली. या घटनेमुळे गावावर एकच शोकाकळा पसरली.

पूजा विष्णुकांत रायपुलवार हिचे आज लग्न होते. शिवणकाम करणाऱ्या तिच्या वडिलांचा सहा महिन्यापूर्वी हृद्यविकाराने मृत्यू झाला आणि त्या पाठोपाठ आईचाही मृत्यू झाला. यानंतर पूजाचे काका अविनाश यांनी तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. स्वतः मुलबाळ नसल्याने अविनाश यांनी मोठ्या लाडात पूजाला सांभाळेल होते. यामुळे लाडक्या पुतणीसाठी त्यांनी मोठ्या उत्साहाने नांदेड येथील मुलाचे स्थळ बघितले. कमवता जावई व चांगले घराणे असल्याने ते या लग्नासाठी खूप आनंदी होते. लग्नाची सारी तयारी त्यांनी स्वतः लक्ष घालत केली.

पूजाचे लग्न मुलाकडे नांदेड येथे करण्याचे ठरले होते. आज सकाळी १०.३० वाजताची विवाहाची वेळ होती. अविनाश यांनी वऱ्हाडी म्हणून साऱ्या गावाला आमंत्रित केले. सकाळी लवकर लग्न असल्याने ते पहाटेच गावात जाऊन सर्वांना लवकर तयार रहा असा निरोप देत होते. निरोप देण्याच्या घाईत त्यांना रस्त्यालगतची जुनी विहीर दिसली नाही व ते यात ते पडले. विहिरी कोरडी होती मात्र यातील खडकावर पडल्याने त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला होता. त्यांना गावकऱ्यांनी लागलीच हदगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. येथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वधूच्या नातेवाईकांसह लग्नासाठी नांदेडला …..
अचानक ओढवलेल्या या गंभीर परिस्थितीत गावकऱ्यांनी काही जवळच्या व्यक्तींना वधूच्या नातेवाईकांसह लग्नासाठी नांदेडला पाठवले. यावेळी वधूला काका केवळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असे सांगण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजास आता काकाच्या जाण्याचे दु:ख पचवावे लागेल. मोठ्या आनंदाने पुतणीच्या लग्नाची तयारी करणाऱ्या अविनाश यांचा तिच्या लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments