Tuesday, December 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेठाकरे सरकार बरखास्त करा, आंबेडकरांची मागणी; सोमवारी राज्यपालांना भेटणार

ठाकरे सरकार बरखास्त करा, आंबेडकरांची मागणी; सोमवारी राज्यपालांना भेटणार

prakash ambedkar demand dismiss the maha vikas aghadi government
prakash ambedkar demand dismiss the maha vikas aghadi government

पुणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकारच बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उद्या सोमवारी ही मागणी करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे. हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. उद्या सोमवारी दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे आहे, असं त्यांनी सांगितलं.

सरकार बरखास्त करा, सभागृह नाही

उद्या दुपारी सव्वाबारा वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली असून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे, मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये, असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत, ॲड. धनराज वंजारी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर हे या शिष्टमंडळात असतील अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments