पुणे: पूजा चव्हाण प्रकरणाला आज आठवडा होत आहे. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं.
पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काही कायदेशीर अडचणी असल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे.
लॅपटॉप, मोबाईलबाबत माहिती नाही
पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल बाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल जमा केला का? त्याची तपासणी केली का? त्यातून काही माहिती आली का? ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होत असलेला मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? याबाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. शिवाय ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत आणि त्यानुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबतही पोलिसांनी मौन पाळलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण होत आहे.
30 ते 32 फूटावरून उडी
पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटी ही तीन मजली आहे. यातील तिसऱ्या मजल्याला पायऱ्या नसल्याने या मजल्यावर कोणालाही जाता येत नाही. या संपूर्ण इमारतीत केवळ पाच कुटुंब राहतात. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपचे आरोप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात एका कथित मंत्र्याचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण होतं. या संभाषणावरून या दोघांनाही पूजा आत्महत्या करणार असल्याचं माहीत असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे भाजपने हा मंत्री संजय राठोड असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मंत्र्याच्या दबावातूनच पूजाने आत्महत्या केल्याचा आरोपही भाजपने केला होता.