मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर आता राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. या लेटर बॉम्बची दखल घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. शऱद पवार हे राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. देशमुख यांच्याविरोधात भाजपने मुंबई, नागपूरसह अनेक ठिकाणी निदर्शने केली. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे भाजपने म्हटले आहे.
हेही वाचा: ‘तलाश नए रास्तों की है..’ संजय राऊतांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंहांनी लिहिल्या पत्रानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद प्रमुख या प्रकरणात अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी पक्षाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्ली येथे बोलावले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असतील.
यासोबतच आज महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही दिल्लीमध्ये जाणार आहेत. ते आज शरद पवारांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहेत. आज गृहमंत्री अनिल देखमुखांबाबत महत्त्वाचा निर्णय गेतला जाऊ शकतो. या बैठकीमध्ये आता नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काय आहेत आरोप?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.