पंढरपूर: पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणुकीवर करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, निवडणुकीबाबत प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २३ मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून ३० मार्च रोजी अंतिम मुदत आहे. तर अर्जाची छाननी ३१ मार्च रोजी असून, ३ एप्रिल पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. १७ एप्रिल रोजी मतदान व २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत.
सलग तीन वेळा भारत भालके याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जावी, अशी मागणी भालके गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. तर याविरोधात प्रशांत परिचारक हे निवडणूक लढविणार का? याबाबत संभ्रम कायम आहे. शिवसेनेचे समाधान आवताडे आणि शैला गोडसे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक देखील चुरशी होईल असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, पोटनिवडणुकीबाबत प्रशासनाने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव म्हणाले, २५२ -पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. तसेच, १८ व १९ मार्च रोजी निवडणूक आयोगाचे पथक दौरा करणार असल्याची देखील गुरव यांनी माहिती दिली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आता पंढरपुरमधील राजकीय वातावरण तापणार आहे.