नाशिक – जिल्ह्यातील प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य घटक असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस नाशिककरांनी धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी नाशिकच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. १ नोव्हेंबरला दरवर्षी हा वाढदिवस साजरा केला जातो.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १ नोव्हेंबर १९७५ रोजी हिरवा झेंडा दाखवून पंचवटी एक्स्प्रेसचा शुभारंभ केला होता. सुरुवातीला या एक्स्प्रेसला १८ डबे होते. त्यानंतर नाशिकच्या चाकरमान्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या २१ करण्यात आली. आज पंचवटी एक्सप्रेसचा ४२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दररोज नाशिक ते मुंबई असे २६१ किलोमीटर अंतर धावणारी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईतील मंत्रालयात काम करणारे कर्मचारी तसेच अन्य नोकरदार व्यावसायिक, विद्यार्थी यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.