मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी ही चूक होती, असं विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांनी आणीबाणीवरून माफी मागितली. आणीबाणी ही चूक असल्याचं कबूल केलं. आता त्यांनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. आणीबाणी चुकीची होती. म्हणजे इंदिरा गांधी यांची त्यावेळची विचारसरणी चुकीची होती का? हे देखील राहुल यांनी स्पष्ट करावं, असं आवाहन शेलार यांनी केलं.
कांजूरची जागा खासगी मालकीची
यावेळी त्यांनी मेट्रो कारशेडवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मेट्रो कारशेड आरेवरून कांजूरमार्गला का हलवत आहात. कांजूरमार्गची जागा खासगी मालकीची आहे. कोर्टात हे सांगितलं आहे. खासगी मालकाकडून आता ही जागा विकत घेतली जाणार आहे. त्यात भ्रष्टाचार होणार आहे. या जागेची किंमत 50 हजार कोटी असू शकते, असंही ते म्हणाले. जळगावात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जळगावची घटना दुर्देवी आहे. ठाकरे सरकारमध्ये महिला आणि बालक असुरक्षित आहेत, असं ते म्हणाले.
मलिक म्हणाले?
नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना गुजरात दंगलीवरून भाजपवर टीका केली. ४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असं मलिक म्हणाले.
ही तर रिअॅक्शन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये जी दंगल झाली ती केवळ रिअॅक्शन होती. गोध्रा कांडाशी संबंधित कोणत्याही चौकशीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं नाही, असं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. इतक्या वर्षानंतर आणीबाणी चूक होती हे काँग्रेसला सूचला. आणीबाणीमुळे हजारो लोकांना त्रास सहन करावा लागला, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले होते होय, ती चूकच होती
कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलं. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.