Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई“अमिबाला सुद्धा लाज वाटेल,” आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

“अमिबाला सुद्धा लाज वाटेल,” आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई: भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला असून खाली डोकं आणि वर पाय अशी त्यांची अवस्था झाली असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसेनेचे भूमिकेवर भाष्य करताना अमिबालाही लाज वाटेल अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजीलला पळून जाण्यात मदत केल्याचा गंभीर आरोप केला.

संजय राऊत यांनी गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कोणी कोणाला कधी आणि कसं भेटावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण शिवसेना शेतकरी आंदोलकांना भेटायला गेली असेल तर लोकसभेत, राज्यसभेत, महाविकास आघाडीच्या बैठकीत काय भूमिका होती आणि आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनावेळी काय भूमिका होती हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा पक्ष शिवसेना आहे”.

सेलिब्रिटी समर्थनावर शिवसेनेच्या टीकेवर भाष्य…
“शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावं. आंदोलन कोणी आणि कसं केलं जावं याचे काही नियम आहेत,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

“जो कोणी देशहिताची, देशरक्षणाची भूमिका घेईल त्या व्यक्ती आणि विचाराच्या विरोधात काही मंडळी ही सातत्याने परकीय शक्तींच्या मदतीने उभं राहून आंदोलन करतात. त्यात आता शिवसेनादेखील मिळाली आहे हे दुर्दैवी आहे,” असा गंभीर आरोप आणि टीका आशिष शेलार यांनी केली.

शरजीलवरुन टीकास्त्र…
“शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परिषदेला परवानगीच का दिली?,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. “शरजील इस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिलं? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचं काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केलं आहे. हे त्यांचं पाप आहे,” असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

“शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, भाजपाने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु हे म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचं काम का केलं हे स्पष्ट करावं,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

“शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावं,” असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना हिंदुत्व भाजपाची मक्तेदारी नाही असं म्हटलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, “जे भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन, आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन आले आहेत. त्यांनी देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुर्यावर थुंकण्याचे प्रयोग करु नयेत”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments