महाबळेश्वर: महिला दिनीच मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम शिक्षकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड ता महाबळेश्वर) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.
सर्वत्र महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने हादरले आहे. दिलीप रामचंद्र ढेबे एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहे. याच शाळेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या जवळच्या नात्यातील १५ वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या बाबत एका जागरूक नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर तक्रार दाखल केली होती.
महाराष्ट् पोलिसांच्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. चौकशीसाठी तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. मागील पाच दिवसांपासून महाबळेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
हेही वाचा: मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला
आरोपी व पिडीत विद्यार्थिनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधून काढला. पीडित मुलीला महाबळेश्वर पोलिसांनी विश्वासात घेतले. यानंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या आत्याचाराचा पाढा वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलिसांनी प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. याबाबत मुख्याध्यापकाने पोलिसांजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा: ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाउन
महाबळेश्वर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर बालकांचे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर पोलीस निरिक्षक बी ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या बलात्कार प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान महाबळेश्वरसारख्या कौटुंबिक पर्यटनस्थळी असा प्रकार घडल्याने येथे संताप व्यक्त केला जात आहे.