परभणी: राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परभणीत स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. 13 आणि 14 मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल.
परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. यापूर्वी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आता नागपुरात लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने परभणीच्या जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय घेण्यात आला आहे की,आज रात्री १२ पासून सोमवारी सकाळी ६ पर्यंत परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात येत आहे. (१/२)#Parbhani#coronavirus pic.twitter.com/hu00nM0Rs1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 12, 2021
पुण्यात रात्रीची संचारबंदी, शाळा 31 मार्चपर्यंत बंद
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.
तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.
पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील.
केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.
खासगी आस्थापने रात्री दहा वाजेपर्यंत तर उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार,कॅफे, डायनिंग हॉल अशा ठिकाणच्या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11वाजेपर्यंत आणि मॉल्सहीत सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 वाजेपर्यत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.