Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडालातूरलढावय्या नेता देवेंद्र भाऊ ! शतायुषी व्हा!!

लढावय्या नेता देवेंद्र भाऊ ! शतायुषी व्हा!!

Devendra Fadnavis, Ramling Shereमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारी वाढदिवस आहे. वयाची 49 वर्षे पूर्ण करून ते 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महाराष्ट्रातल्या या उमद्या नेत्याने पन्नाशीला स्पर्श केला आहे. सक्रिय राजकारणातील सत्तावीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव वयाच्या पन्नाशीत  त्यांना मिळाला आहे. त्यात ते चौथ्यांदा आमदार आहेत. त्यापूर्वी नगरसेवक, महापौर होते आणि आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असे बिरुद त्यांच्या नावाआधी लावले जात आहे,. धरमपेठ त्रिकोणी पार्कमधील बंगल्यापासूनचा  त्यांचा प्रवास मलबार हिलवरील “वर्षा”पर्यंत पोहोचला. ही वाटचाल कौतुकास्पद तर आहेच पण आदर्श राजकारणाचा परिपाठदेखील आहे. देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे नगरसेवक उपमहापौर आणि विधानपरिषदेचे सदस्यदेखील होते.

उमद्या मनाचा दिलदार नेता अशी त्यांची ओळख होती आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांनी मैत्र जपले होते.त्याचवेळी संघ, जनसंघ आणि भाजपवरील त्यांची निष्ठा अढळ होती आणि पक्षाबाबत त्यांनी कोणत्याही पातळीवर कधीही कुठलीही तडजोड स्वीकारली नाही.वडिलांचा तोच वारसा देवेंद्र आज राजकारणात चालवत आहेत. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महाराष्ट्रात भाजप त्यांच्या नेतृत्वात क्रमांक एकवर गेला त्यामागे राजकीय फायद्यासाठी विरोधकांशी तडजोड न स्वीकारणे हे एक प्रमुख कारण आहे.

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याला वाचवण्याची भूमिका कधीही घेतली नाही. त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी तसे केले. भाजपमधील एकेका नेत्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीतील एक-दोन मंत्र्यांशी अगदीच गूळपीठ होते, फडणवीस त्याला अपवाद होते. पंधरा वर्षे विरोधी पक्षाचे आमदार असताना कुण्या मंत्राच्या दालनांमध्ये हाजीहाजी करत फायलीवर सही घेण्यासाठी फडणवीस थांबले आहेत असे कोणी कधी पाहिले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फडणवीसांना तिसऱ्या आमदारकीच्या तिसऱ्या टर्मपर्यंत बऱ्याच मंत्रांची दालने कुठे आहेत हे देखील माहिती नव्हते.

2018 मधील आषाढी एकादशीला ते पंढरपूरला जाऊ शकले नव्हते कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि मुख्यमंत्री पंढरपूरला गेले तर अनुचित घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात होती.  एका क्षणी त्यांनी विचार केला की विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी मला गेलेच पाहिजे पण दुसऱ्याच क्षणी वारकऱ्यांच्या मनामनात वसणाऱ्या विठुरायाला कुठलेही विघ्न येता कामा नये या भावनेने त्यांनी तेथे न जाण्याचा निर्णय घेतला. नियती कशी असते बघा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही असे बजावणाऱ्यांनी यावेळी त्याच पंढरपुरात आणि आषाढी एकादशीच्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मराठा समाजाला आरक्षण देणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

पंढरपुरात जाण्यास मज्जाव केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांबद्दल आकसाची कुठलीही भावना  मनात ठेवली नाही आणि एक वर्षानंतर सत्कार स्वीकारताना आधीच्या वर्षी झालेल्या अपमानाचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. मुळात वर्षभरापूर्वीच या प्रसंगाकडे त्यांनी अपमान म्हणून बघितलेच नव्हते. मनाचे मोठेपण असलेला नेता असाच असतो. समाजातील प्रत्येक प्रश्नाकडे जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघितले पाहिजे हा फडणवीस यांच्यावरील संस्कार आहे आणि तो त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्यामुळे सुरुवातीला दोन-तीन वर्षे त्यांच्याविषयी जातीच्या अनुषंगाने असलेले गैरसमज पानगळीसारखे गळून पडले.

फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. गेल्या पावणेपाच वर्षात महाराष्ट्राला या दूरदृष्टीचा प्रत्यय अनेकदा आला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही बँकांना गब्बर करण्यासाठी होता कामा नये. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा विचार समोर ठेवून हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी दिली.जलयुक्त शिवारसारखी महाराष्ट्राच्या कपाळावरील दुष्काळाचा शाप मिटविण्याचा प्रामाणिक हेतू असलेली योजना त्यांनी आणली. शासकीय कामांमधील लालफितशाहीचा फटका सामान्यांना बसू नये म्हणून सेवा हमी कायदा आणला. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र अंतर्गत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात आणून दाखवली.मुख्यमंत्री सहायता निधी आणि मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत करण्यात आली. इतिहासात एवढी मदत पाच वर्षात कधीही झाली नव्हती. विदर्भ आणि मराठवाडा यांचे मागासलेपण कायमचे संपवण्याची अपार क्षमता असलेला समृद्धी महामार्ग हा तर फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता त्याचे कामदेखील सुरु झाले आहे.

नागपूर-मुंबई अंतर केवळ सहा तासात त्यामुळे पार करता येईल. मुंबई पुणे आणि नागपूर यातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे उभारलेले जाळे ही फडणवीस यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. फडणवीस हे आज वयाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची निरपेक्ष भावनेने सेवा करणाऱ्या या नेत्याचे भवितव्य उज्वल आहे.आणखी पाच-पंचवीस वर्षांची सक्रिय राजकारणाची खेळी त्यांना खेळायची आहे. निष्कलंक चारित्र्य जपणारा हा नेता नेहमीच पारदर्शक कारभारासाठी आग्रही राहिला आहे. त्यातून त्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदराची आणि विश्वासाची भावना आहे. हा विश्वासच त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद देईल याबाबत शंका नाही. ‘महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल’, असा निर्धार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनापासून शुभेच्छा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments