Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्र…महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही; शिवसेनेचा भाजपाला इशारा

…महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही; शिवसेनेचा भाजपाला इशारा

मुंबई: “ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा देत शिवसेनेनं भाजपाच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात विश्लेषण केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी सरकारनं बाजी मारल्याचा दावा करताना शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही.

‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपाची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 “राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे. विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन हे मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याची तोंडपाटीलकी चंद्रकांत पाटील यांनी केली होती, पण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आहे. भाजपचा पराभव करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबाच दिला आहे.

विरोधी पक्षाने गेल्या काही दिवसांत आपल्या अकलेचीच दिवाळखोरी जाहीर केली. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची चिंता न करता त्यांनी सुशांत राजपूत, कंगना राणावत, ईडीची वाटमारी याच विषयांवर कोळसा उगाळण्याचे कार्यक्रम केले. देशात महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी आहे. कृषी कायद्याचा विषय पेटला आहे, पण देशाच्या सुरक्षेची गुपिते फोडणाऱ्या अर्णब गोस्वामीला खांद्यावर उचलून नाचविण्यात विरोधी पक्षाने धन्यता मानली.

या विषयाशी शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा काय संबंध? देशद्रोही कृत्ये करणारा अर्णब गोस्वामी यांचा लाडका आणि हक्कासाठी लढणारा शेतकरी मात्र देशद्रोही ठरवण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला. हा प्रकार त्यांच्यावर उलटला आहे. ठाकरे सरकार लोकांच्या मनास भिडले आहे. उद्धव ठाकरे यांचे विनम्र वागणे लोकांना भावले आहे. ग्रामपंचायत निकालांचा तोच अर्थ आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

चला, हवा येऊ द्या!

“विरोधी पक्षाला आजही एक भ्रम कायम आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पडेल, आपणच पुन्हा अलगद सत्तेवर येऊ. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरायला ही मंडळी तयार नाहीत.

आज ना उद्या हे सरकार पडणारच आहे, मग उगाच लोकांच्या प्रश्नांवर रान का उठवायचे या भूमिकेत ही मंडळी आणखी किती काळ राहणार? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही व आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेची पावले योग्य दिशेनेच पडत आहेत. भुलभुलैयांच्या धुक्यातून ती बाहेर पडली आहे. पंतप्रधान मोदी हे देशभर पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत, पण महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांचेच गारुड आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गावातील ग्रामपंचायत जिंकू शकले नाहीत. फक्त आम्हीच, दुसरा कोणी नाही असा तोरा मिरविणाऱ्यांचा हा पराभव आहे.

विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? महाविकास आघाडी सरकारला जनतेचा ‘कौल’ नाही असे म्हणणाऱ्यांच्याच घरावरची ‘कौले’ जनतेने काढून टाकली आहेत.

ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या!,” असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments