मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांवरील भाजपावर हल्लाबोल केला. अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून भाजपा आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं. “शिवसेना तर स्वातंत्र्यलढ्यात नव्हती, पण तुमची मातृसंस्था पण नव्हती,” असं सांगत “भाजपाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही,” असं टीकास्त्र ठाकरेंनी डागलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,”संत नामदेव यांचं स्मरण झालं पाहिजे. राज्याची अनमोल रत्न आहेत. महिला पुरुष असतील त्यांची एकत्र मिळून नावं काढू, त्यांच्याप्रती ऋण अर्पण करुयात. संत नामदेव महाराष्ट्राच्या मातीचा पुत्र होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कामं केले. त्यांनी पंजाबला जाऊन काम केले. ते मोठे होते म्हणून आपण मोठे आहोत,” असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.
“आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. वीजेबद्दलचा निर्णय आपण कालच घेतला आहे. पण, जे शेतकरी तिकडे आंदोलन करत आहेत. त्यांची वीज कापली जाते. त्यांची शौचालये तोडली जात आहेत. पाणी बंद केलं जात आहे. इतकंच नाही, तर ते देशाच्या राजधानी येऊ नयेत म्हणून त्यांच्या वाटेत खिळे टाकले जात आहेत. ज्या तारांचं कुंपण सीमेवर असायला हवं ते त्यांच्या वाटेत टाकलं जातं.
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. तिकडे काहीच नाही. हा बंदोबस्त सीमेवर केला असता, चीन देशाच्या हद्दीत घुसला नसता. शेतकरी अतिरेकी आहेत का? असं समजू नका की, देश ही तुमची खासगी मालमत्ता आहे. शेतकऱ्यांची सुद्धा मालमता आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
“कदाचित शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. पण, तुमची मातृसंस्था आहे, ती कधीही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. म्हणून भारत माता की जय बोललं की देशप्रेम सिद्ध होत नाही. सत्ता मिळाल्यानंतर देशातील जनतेला न्याय देत नसाल, तर भारत माता की जय बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. पण लक्षात ठेवा देश तुमची मालमत्ता नाहीच, पण महाराष्ट्रही नाही,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.