मुंबई: सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू असताना आता याचवेळी बदली करण्यात आलेले दुसरे ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांनी सरकारविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
फक्त उद्धव ठाकरे सरकारच नाही, तर याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने देखील आपल्यावर अन्यायच केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. या मुद्द्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय विश्वामध्ये पुन्हा नव्याने आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता असून मुंबईच्या पोलीस दलातील आत्तापर्यंत झाकलेली नाराजी चव्हाट्यावर येण्याचीही शक्यता आहे.
Not just current government but previous government has also been unjust to me. Seniority was overlooked while making transfers & appointment among senior ranks. The current government’s actions aren’t as per SC orders: Sanjay Pandey, DG Maharashtra State Security Corporation pic.twitter.com/CoDtZacdYK
— ANI (@ANI) March 18, 2021
काय म्हणाले संजय पांडे?
परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली होती. मात्र, आता संजय पांडे यांनी फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
“फक्त हेच सरकार नाही, तर याआधीच्या सरकारने देखील माझ्यावर अन्यायच केला आहे. वरीष्ठ पदांसाठी बदल्या आणि नियुक्त्या करताना सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केलं गेलं. राज्याच्या विद्यमान सरकारची कृती ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना धरून नाही”, असा थेट आक्षेप संजय पांडेंनी उपस्थित केला आहे.
संजय पांडे यांच्याकडे होमगार्डच्या डीजी पदाची जबाबदारी होती. मात्र, परमबरी सिंग यांच्यासोबत त्यांची देखील बदली करण्यात आली असून आता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबत परमबीर सिंग यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी काढून होम गार्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संजय पांडे यांनी थेट शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. “१९९३मध्ये झोन ८ चा डीसीपी म्हणून मी खेरवाडी भागात शिवसेनेविरोधात एक चौकशी केली होती. पण जर अशा पद्धतीने गोष्टी हाताळल्या जात असतील, तर आपण नक्कीच सुरक्षित हातांमध्ये नाहीत”, अशी गंभीर आरोप त्यांनी केला आहे.