मुंबई: दिवाळीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान देण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून आज राणे यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत खरेच ठरतात मात्र मुख्यमंत्री नेमके काय बोलले ते पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया राणे यांनी माध्यमांकडे दिली.
माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मी महाराष्ट्रात सर्व पदे भूषविली आहेत. महत्वाकांक्षा बऱ्याच असल्या तरी मी संतुष्ट आणि समाधानी आहे, असेही राणे यांनी नमूद केले.
मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. या फोडाफोडीवरून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात शब्दयुद्ध पेटले आहे. याबाबत विचारले असता या दोघांमधील वाद हा घरगुती मामला आहे. मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही, असे राणे म्हणाले. राजकारणात नातं आणि नैतिकता आता शिल्लक राहिलेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.