महत्वाचे….
१.ठाणे महापालिका देणार निधी २. हजारो रहिवाशांना भुयारी मार्गाचा फायदा होणार ३.पर्यायी मार्गाचा वापर होणार ३.२४ जून २०१६ पासून सुरु होता पाठपुरावा
ठाणे – मुंब्रा रेतीबंदर परिसरात रेल्वे रुळांपलिकडे राहाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे रुळांखालून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून ठाणे महापालिकेकडून निधी उपलब्ध होताच या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याची तयारी रेल्वेने दाखवली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याची ग्वाही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खा. डॉ. शिंदे यांना दिल्यामुळे लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होऊन हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरात रुळांच्या पलिकडे, डोंगराला लागून असलेल्या परिसरात राहाणाऱ्या हजारो रहिवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. या ठिकाणी अपघात होऊन अनेकजणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्ग व्हावा, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात रेल्वेशी २४ जून २०१६, ३ सप्टेंबर २०१६ आणि १० ऑक्टोबर २०१७ असा वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. शुक्रवारी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंते (दक्षिण) रिझवान व संबंधित अधिकाऱ्यांसह खा. डॉ. शिंदे यांनी जागेची पाहाणी केली असता ठाणे महापालिकेने निधी उपलब्ध करून दिल्यास भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यास रेल्वे तयार असल्याचे रिझवान यांनी सांगितले.
खा. डॉ. शिंदे यांनी तात्काळ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होऊन हजारो रहिवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.