मुंबई : कोल्हापूरमध्ये कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांना रक्कम नसलेली प्रमाणपत्रं यावेळी वितरित करण्यात आल्यामुळे नेमकी किती किती रुपयांची कर्जमाफी झाली याबद्दल शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीये.
मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलीये. अतिथीगृहावर १५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासह पुणे, नागपूर आणि कोल्हापुरातही कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह हॉल इथं कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं.
यावेळी कर्जमाफी झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना साडी चोळी आणि धोतर देऊन सन्मान करण्यात आला. आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. त्यात आज संपूर्ण राज्यात सरकारने प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने अखेर आजचा मुहूर्त साधला खरा, पण रक्कम नसलेल्या प्रमाणपत्रांमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला.