Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमराठवाडाबीडजिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

बीड : सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी १ लाख १५ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने रंगेहात पकडले. ही कारवाई आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केली. शेळके हा वादगस्त अधिकारी म्हणून परिचित आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्हा पुरवठा विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वेळेवर न देणे, त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे, अरेरावी करणे, वेळेवर कामे न करणे यासारख्या तक्रारी वाढल्या होत्या. अनेकांनी निवेदनामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी
केल्या. मात्र, याचा कसलाही परिणाम पुरवठा विभागावर झाला नव्हता. अशाच एका प्रकरणात बीडमधील धानोरा रोडवरील सावित्रीबाई फुले महिला बचतगट या नावाचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानातील गैरव्यवहाराबाबत तक्रारदाराने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याची चौकशी करुन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके याने दुकानाचा परवाना रद्द केला. याचाच राग मनात धरुन दुकानाच्या मालकीणीने तक्रारदारविरुद्ध शेळकेकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी शेळकेकडे सुनावणी सुरु होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी शेळके याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने २२ डिसेंबर २०१७ रोजी बीड एसीबीकडे शेळकेविरोधात तक्रार दाखल केली. एसीबीने खात्री केली. आज दुपारी कार्यालयातीलच लेखा परिवेक्षक बब्रूवान फड याने शासकीय विश्रामगृहाजवळ तक्रारदाराला १ लाख १५ हजार रुपये घेऊन बोलावले. एसीबीने या ठिकाणी सापळा लावला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच झडप घालत एसीबीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी फडला पैशांसह रंगेहात पकडले. त्यानंतर फडला गाडीत बसवून जिल्हाधिकारी कार्यालयातील एन. आर. शेळकेच्या केबीनकडे नेले. येथे त्याने ठरल्याप्रमाणे शेळकेला पैसे दिले. शेळकेने पैसे स्वीकारताच त्यालाही कार्यालयातच ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करुन एसीबीच्या कार्यालयात आणले. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक अर्चना जाधव, दादासाहेब केदार, अशोक ढोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकूर, प्रदीप वीर, अमोल बागलाने, मनोज गदळे, सय्यद नदीम यांनी केली.

बीड, औरंगाबादमधील घरांची झाडाझडती
कारवाई होताच औरंगाबादमधील शेळकेच्या दोन्ही घरांची झडती घेण्यात आली. तसेच बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शनमधील घराची झडती घेतली. फड याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले होते.

तीन महिन्यांपासून मागावर
तक्रार दाखल झाल्यापासून एसीबीचे अधिकारी व कर्मचारी शेळकेच्या मागावर होते. परंतु तो स्वत: पैसे न घेता कारकून फड मार्फत पैसे घेत होता. प्रत्यक्षात तो समोर येत नसल्याने कारवाईत अनेकवेळा अडचणी आल्या. अखेर आज फडने लाचेची रक्कम स्वीकारुन शेळकेच्या स्वाधीन करताच दोघांनाही ताब्यात घेतले.

पंडितविरुद्धच्या तक्रारीने चर्चेत
एन. आर. शेळके याने आ. अमरसिंह पंडित, त्यांचा पी. ए. व अन्य एक खाजगी व्यक्ती आपल्याला फोनवरुन धमक्या देत असल्याची तक्रार शिवाजीनगर ठाण्यात दिली होती. या प्रकरणाने शेळके चर्चेत आला होता. त्यानंतर अवघ्या १२ तासातच शेळकेला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी आ. अमरसिंह पंडित यांनी शेळके हा भ्रष्ट अधिकारी असल्याचे पत्रक काढले होते.

जालन्यातही वादग्रस्त कार्यकाळ
जालना येथेही एन. आर. शेळके यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. सर्वसामान्यांची कामे वेळेत न करणे, अडवणूक करणे यासारख्या तक्रारी शेळकेविरुद्ध होत्या. जमिनीच्या प्रकरणात त्याच्यावर एकदा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments