मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदारपदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे, नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचेकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसचीही भूमिका आहे.
हेही वाचा: सचिन वाझेंच्या सोसायटीमधून CCTV फुटेज गायब; मात्र NIA ला पुरावे मिळाले?
कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणविसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे.
मोठा आवाज करुन आरडाओरडा करुन महत्वाचे प्रश्न दबले जात नाहीत. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये संविधान महत्वाचे असते, त्यात कायदे व्यवस्था, न्याय व्यवस्था सर्वांसाठी समान आहेत. कोणीही चौकशीच्या चौकटीत येतात. फडणवीसही त्याच चौकटीत बसतात त्यांनी या प्रकरणातील सर्व माहिती तपास यंत्रणांना देऊन जनतेसमोर योग्य आदर्श घालून दिला पाहिजे हीच भावना आहे, असे सावंत म्हणाले.