मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्य सरकारची भविष्यातील कार्यशैली काय असेल याचे प्रतिबिंब असणे अपेक्षित असते. त्यादृष्टीने विचार करता राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती आहे. कोणतीही आकडेवारी त्यात नाही. त्यातही राज्य सरकारचा माझे कुटुंब माझी जबाबदारी ते मी जबाबदार हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघाती हल्ला ,विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत उपस्थित चर्चेदरम्यान बोलतांना केला.
ते पुढे म्हणाले की राज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते परंतु, त्यांना विमान नाकारणे हा प्रकार अधिकच गंभीर होता. राज्यपालांनी अभिभाषणातून मांडलेले मुद्दे ही पोकळ माहिती आहे. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधता येऊ शकत नाही . राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, हीच समाधानाची बाब आहे. राज्यपाल आणि सरकार मतभेद असू शकतात. यापूर्वी सुद्धा झाले , पण इतका कोतेपणा सरकारने कधीही दाखविला नाही. राज्यपालांना विमान नाकारणे हा प्रकार अधिकच गंभीर होता.
राज्यात आजही कोरोनाची गंभीर स्थिती आहे परंतु, ज्या पद्धतीने राज्यात कोरोनाचे संकट हाताळले जात आहे ते अतिशय गंभीर आहे.आधीही सातत्याने कमी चाचण्या केल्याने महाराष्ट्रात कोरोना वाढला. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात मविआ सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात मविआ सरकारने कोरोना नीट हाताळला असता तर ९,५५,००० रुग्ण कमी राहिले असते, ३०,९०० मृत्यू कमी झाले असते.
हेही वाचा: “अजित पवारांचे दगड मारून स्वागत करायला पाहिजे”;निलेश राणेंचा ट्विटरवरून हल्लाबोल
आता ही जबाबदारी कुणाची? आजही राज्यात अतिशय गंभीर स्थिती राज्यात आहे.आजही अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटीव्ह देणारे रॅकेट आहे. नवी मुंबईत ७८०० पॉझिटीव्ह विनाचाचण्यांचे ? नुसता सावळा गोंधळ सुरु आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचे काम झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की ,हे सगळे घडत असताना सरकार मात्र केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पण, २१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते.मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही.नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले!
आदिवासी खावटी योजनेचा सुद्धा गेल्या वर्षभरापासून फायदा दिला जात नाही, काही खास लोकांना फायदा मिळावा यासाठी १ वर्ष हा साधा विलंब समजायचा का असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला. समिती म्हणते थेट रोख रक्कम द्या. मग का देत नाही? ९० टक्के लाभार्थी फायदा मिळत असताना DBT बंद केली जात आहे. केवळ मलिदा खाण्यासाठी चांगल्या योजना का बंद करण्यात येत अहित हे न समजण्यासारखे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
राज्य सरकारची वारकरी संप्रदायाबद्दल काय नाराजी आहे ,हे न समजण्यासारखे आहे. संत नामदेव महाराज यांचा सरकारला विसर पडला. कोणतेही कार्यक्रम सरकारने घेतले नाही. हे वर्ष संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. परंतु त्यासाठी सरकारचे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन नाही.शिवजयंती आणि मंदिर यामुळेच कोरोना वाढतो का , असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना फडणवीस म्हणाले कि शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरु आहे. अमरावती, अकोला या विभागात ८८ ते १०० टक्के नुकसान बोंडअळीमुळे झाले आहे.मराठवाड्यात अवकाळीने नुकसान पण मदत मिळत नाही. एकीकडे मदत नाही आणि दुसरीकडे वीज कापली जात आहे.
मोठी वाजतगाजत आणलेली ‘विकेल ते पिकेल योजना’ , यात पुढे काहीच झाले नाही. या योजनेमध्ये १३४५ मूल्यसाखळीचे नियोजन होते परंतु अजून साधा स्टाफ दिला नाही. आतापर्यंत केवळ २९ ला मंजुरी देण्यात आली आहे. योजनेची ५ टक्के सुद्धा अंमलबजावणी नाही.
जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलले आणि योजनेला नवा पर्याय दिला. पण घोषणा केल्यावर ११ महिने मंत्रिमंडळात निर्णय नाही. किमान मुख्यमंत्र्यांचे नाव दिले तर ती तर योजना नीट राबवा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्या योजना राबविताना तर नीट भान ठेवा ,अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची घडी अत्यंत विस्कटलेली आहे हे सांगतांना ते म्हणाले, राज्यातील कंत्राट देण्याच्या दबावातून २ कुलगुरू राजीनामे देतात. किती गंभीर आहे. इंडिया जस्टीस रिपोर्टमध्ये महाराष्ट्र पोलिस दल २०१९ च्या चौथ्या क्रमांकावरून २०२० मध्ये १३ व्या क्रमांकांवर आले.मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोन कोण टॅप करते आहे, हेही सांगा. मंत्री स्वतः ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात यातून काय समजायचे? पूजा चव्हाण प्रकरणात जितके पुरावे आहेत, तितके पुरावे कोणत्या प्रकरणात नसतील.तक्रार नाही म्हणून केस होत नाही असे कोण सांगते?खटला चालतो तेव्हा तो राज्य विरुद्ध आरोपी असा असतो.
हेही वाचा:शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले प्रकरण, कंगनाविरुद्धच्या कारवाईला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार
मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई नाही.स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे येतात. इतका पोलिसांवर दबाव आहे.सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आणि जनतेसाठी दुसरा. कशाला हवा शक्ती कायदा? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. राज्य सरकारच्या दृष्टीने मंदिरात कोरोना, शिवजयंतीत कोरोना पण वरळीत पहाटेपर्यंत कुणाच्या आशीर्वादाने बार चालतात, तेथे कोरोना का येत नाही, हे न समजण्यासारखे आहे.
देशाबद्दल ट्विट करणाऱ्या या भारतरत्नांची लतादिदी आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी अन ग्रेटाचे समर्थन , याला काय म्हणावे ? २६ जानेवारीची दिल्लीतील हिंसा ही साधी नाही. त्या पार्श्वभूमीवर भारत एकसंध राहील, असे म्हणणे गैर आहे का? देशाबद्दल ट्विट करणाऱ्या या भारतरत्नांचा आम्हाला अभिमान ,असेही त्यांनी सांगितले. शीख फॉर जस्टीस यांनी एक पत्र उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांना पाठविले. स्वतंत्र राष्ट्र करा म्हणून. अशांना थारा द्यायचा नसतो असे विरोधी पक्षनेते यावेळी बोलतांना म्हणाले.
अभिभाषणात संभाजीनगरचा उल्लेख नाही.किमान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर शब्द पाळा.आमच्यावेळी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे आता गप्प आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे.वैधानिक मंडळ हा विदर्भ, मराठवाड्याचा हक्क आहे. त्यामुळे यावर सरकारने सत्वर कारवाई केली पाहिजे.