Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबोईसर एमआयडीसीत भीषण आगीत; ३ ठार!

बोईसर एमआयडीसीत भीषण आगीत; ३ ठार!

Boisar fire,palgahr,MIDCपालघर: पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील एका कारखान्यात काल रात्री बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीनजण ठार, १२ जण जखमी झाले आहेत. आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्यानं एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले. सुमारे दीड तास स्फोटांचे आवाज सुरू होते. या स्फोटांमुळं पालघर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांनाही हादरे बसले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं नागरिकांमध्ये घबराट उडाली होती.

बोईसर एमआयडीसीतील झोन सातमध्ये असलेल्या नोवाफिन केमिकल कंपनीच्या कारखान्यात रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरचा हा स्फोट होता. या स्फोटामुळं कारखान्यात भीषण आग लागली. संपूर्ण कारखाना आगीत खाक झाला आणि बघता बघता संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. ही आग शेजारच्या तीन केमिकल कारखान्यांमध्ये पसरल्यानं स्फोटांची मालिकाच सुरू झाली. या दुर्घटनेत आरती कंपनीतील पिंटू कुमार गौतम, जनू अडारिया आणि अलोक नाथ या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. आग नियंत्रणात आणण्यात यश आलं असलं तरी मधूनच धुमसणाऱ्या आगीवर अग्निशमन दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत.

लोक घरं सोडून पळाले….
बोईसर एमआयडीसीत झालेले स्फोट इतके भीषण होते की त्यामुळं सुमारे २० किलोमीटरचा परिसर हादरून गेला. पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणीसह अनेक गावांत हादरे जाणवले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागी जमा झाले. सर्वत्र एकच घबराट उडाली होती. मात्र, हा भूकंप नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments