महत्वाचे…
१. चित्रकुट विधानसभेची जागा काँग्रेस आमदार प्रेम सिंह यांच्या निधनाने जागा रिक्त झाली होती. २. या जागेवरील पोट निवडणुकीत १२ उमेदवार होते रिंगणात ३. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीन दिवस चित्रकूटचा दौरा करुनही फायदा झाला नाही.
चित्रकूट़: मध्य प्रदेशातील चित्रकूट विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठी यांचा १४,३३३ मतांनी पराभव केला. चतुर्वेदींना ६६,८१०, तर त्रिपाठींना ५२,४७७ मते मिळाली.
काँग्रेसचे आमदार प्रेम सिंह यांच्या निधनानंतर चित्रकूट विधानसभा मतदारसंघासाठी ९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. ६२ टक्के मतदान झाले होते. भाजप आणि काँग्रेसमध्येच चुरस होती. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी पुन्हा काँग्रेसलाच कौल दिला. या जागेवरील पोट निवडणुकीत तब्बल १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अटीतटीच्या या लढतीत भाजप आणि काँग्रेसने प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता. यातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीन दिवस चित्रकूटचा दौरा करून हि लढत प्रतिष्ठेची केली होती. तरीही काँग्रेस उमेदवार नीलांश चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठींचा १५ हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.