मुंबई/पुणे – राज्य सरकारचा मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांच्या नावांची घोषणा केली. ५ लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २० नोव्हेंबरला बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील.
नेपथ्यकाराचा गौरव-
बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक, अशा रंगभूमीच्या तिन्ही धारांमध्ये त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. आजवर त्यांनी ४८५ नाटकांचे नेपथ्य केले आहे.
नाट्य क्षेत्रातील तपस्येचा सन्मान-
निर्मला गोगटे यांना पं. कृष्णरावचोणकर, बी.आर. देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन मिळाले. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार,नानासाहेब फाटक यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. निर्मला गोगटे यांनी व्यावसायिक रंगभूमीबरोबरच संस्कृत नाटकांतदेखील भूमिका केल्या आहेत.