सोलापूर – बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून लुटलेली ७० लाख रुपयांची रक्कमेचा शोध घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आहे. लुटलेली ७० लाख रुपयांची रक्कम सापडली असून या प्रकरणात बँकेच्या अधिका-यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सांगोला शाखेचा व्यवस्थापक फिर्यादी अमोल भोसले हाच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (१ नोव्हेंबर ) रात्री उशीरा पंढरपूर पोलिसांनी मंगळवेढ्यातील एका गावातून ७० लाख रुपये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बँक व्यवस्थापक अमोल भोसले हा कर्जबाजारी झाला होता. सांगोल्याला येण्याआधी मंगळवेढा तालुक्यातील नदेश्वर शाखेला व्यवस्थापक होता. त्यावेळी त्याची ओळख शेजारील गावातील काही तरुणांशी झाली होती. लुटीचा बनाव करण्यासाठी त्याने या तरुणांना हाताशी धरले. ”निम्मे तुम्ही, निम्मे आम्ही’ या तत्त्वावर हे तरुण लुट करण्यासाठी तयार झाले. चित्रपटाची पटकथा असावी, अशी कथा भोसलेनी तयार केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या बनवा-बनवीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. चौकशीची सुरुवातच भोसलेपासून केली. चौकशीदरम्यान, व्यवस्थापक भोसलेचे आयडिया कंपनीचे सिम कार्ड घटनास्थळी सापडले होते. तसेच व्यवस्थापक भोसले हा सुरुवातीपासूनच उडवाउडवीची उत्तरे देत असल्यानं पोलिसांनी त्याचा सात बारा उतारा काढला होता. त्यामुळे पोलिसांचे काम आणखी सोपे झाले होते आणि हा गुन्हा उघडकीस आला.
नेमकी काय आहे घटना? बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून अज्ञात चोरट्यांनी ७० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून ७० लाख रुपयांची रक्कम लुटली होती. ही घटना सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ इंडिया या बँकेची व्हॅन सांगोला तालुक्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी पंढरपूरहून निघाली होती. ही गाडी सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ आली असता अज्ञात चोरट्यांनी बेलेरो गाडीत येऊन पैसे घेऊन जाणा-या व्हॅनच्या समोर आडवी लावली. यानंतर गाडीत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून त्यांना मारहाण केली व गाडीतील ७० लाख रूपये लुटले. रक्कम लुटल्यानंतर चोरटे पंढरपूरच्या दिशने पसार झाल्याची माहिती समोर आली होती.