मुंबई : जालना येथील प्रेमीयुगुला मारहाण करत त्यांचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या चेहरा पेट्रोल टाकून जाळला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
महाविद्यालयात शिक्षिका तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न आज सोमवार ( ३ फेब्रुवारी ) घडला. तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले. हिंगणघाट येथे हा प्रकार घडला असून पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकी नगराळे याला ताब्यात घेतले आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलीस अधीक्षक वर्धा यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई होईल.@DGPMaharashtra
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 3, 2020
एकतर्फी प्रेमातून घडली घटना…
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून आरोपी विकी नगराळे याने सकाळी कामावर निघालेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल फेकून तिला पेटवून दिले आणि फरार झाला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण, पीडित तरुणी ज्या बसने रोज महाविद्यालयात कामावर जात होती त्याच बसने नगराळेही दररोज प्रवास करीत असे. मात्र, आज तो या बसमध्ये नव्हता यावरुन त्याने थंड डोक्याने कट रचून हा प्रकार केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पीडित तरुणीचा चेहरा पूर्णतः जळाला…
या घटनेमध्ये पीडित तरुणीचा चेहरा पूर्णतः जळाला असून तिची वाचाही गेली आहे. तसेच तिच्यावर डोळे गमावण्याचीही वेळ येऊ शकते असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वीही देखील नगराळेने तिला बसमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दिवसाढवळ्या भरचौकात हा प्रकार घडल्याने तिथल्या नागरिकांनाही याचा धक्का बसला होता. घटना घडल्यानंतर तत्काळ पीडित तरुणीला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने नंतर तिला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.