Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात १०२ चारा छावणी घोटाळेबाजांना दणका!

साताऱ्यात १०२ चारा छावणी घोटाळेबाजांना दणका!

महत्वाचे…
१. माणमधील ९४ तर फलटणमधील १८ छावणी चालकांना दणका
२. गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरु
३. हायकोर्टाने दिले होते गुन्हे दाखल करण्याचे आदेश


सातारा: सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण येथे २०१३ मधील चारा छावणी घोटाळ्याप्रकरणी अखेर चालकांना चांगलाच दणका बसला. साताराच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी माणमधील ९४ तर फलटणमधील १८ छावणी चालकांना दणका दिला. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माण आणि फलटणमध्ये २०१३ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. या कालावधीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. या छावण्यात  असंख्य गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. जनावरांना पुरवण्यात येणारा ओला, सुका चारा, पेंड, मिनरल व पाण्याचे अनुदान वेळेत न देणे असे प्रकार उघडकीस आले. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल झाली होती. मंगळवारी हायकोर्टाने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संध्याकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

आगासवाडी व म्हसवड येथील माण देशी फाऊंडेशनच्या दोन छावण्या सोडून अन्य छावण्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. या प्रकरणात आता विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि या भागांमधील प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा दाखल होणार असल्याने चारामाफियांचे धाबे दणाणले आहेत. फलटण व माण तालुक्यात अनेक ठिकाणी संस्था व सोसायटी यांच्या माध्यमातून चार छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. अशा छावणी चालक व सचिवांवर गुन्हे दाखल होणार आहेत. बुधवारी दुपारपर्यंत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments