Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeविदर्भनागपूर…तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही- खडसे

…तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही- खडसे

नागपूर: राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाला घरचा आहेर दिला. सरकार आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी सरकारने दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. सर्वेक्षण होऊन चार-सहा महिने उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. या काळात लोकांनी मरायचे का? सरकार त्यादृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील करत नाही. दुष्काळी क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी केंद्र सरकारचे निकष पाळायचे ठरवले तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही, अशा शब्दांत खडसेंनी सरकारला सुनावले.

खडसेंच्या या प्रश्नाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. केंद्र सरकारने दुष्काळी क्षेत्र ठरवण्यासाठी आखून दिलेले नवे निकष हे कठोर आणि वेगळे आहेत, ही बाब आम्हाला मान्य आहे. मात्र, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकही गाव निकषांमध्ये बसणार नाही, ही बाब तितकीशी खरी नाही. आतापर्यंत गोंदियातील तीन गावांना याच निकषांनुसार दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने एकनाथ खडसे पुन्हा एकदा आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना दिसले.

सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खडसे वारंवार परखड पण पक्षविरोधी भूमिका घेताना दिसले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही मतदारसंघातील कामे होत नाहीत, अगदी मुख्यमंत्र्यांना भेटून आणि त्यांनी आदेश देऊनही पाणीपुरवठा यासारख्या जिव्हाळ्याची आणि लोकांच्या हिताच्या योजना मार्गी लागत नाहीत. सभागृहात विषय आल्यावर लगेच कार्यवाहीचे आश्वासन दिले जाते. हेच तुमचे राज्य आहे, असा जाब त्यांनी नुकताच भाजपच्या मंत्र्यांना विचारला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments