Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रखा. महाडिक भाजपाचे नगरसेवक घेऊन पवारांच्या भेटीला

खा. महाडिक भाजपाचे नगरसेवक घेऊन पवारांच्या भेटीला

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून व भाजपाच्या जवळीकतेवरुन जोरदार चर्चा सुरु असतांना रविवारी वेगळ्याच घडामोडी घडल्या. सकाळी महाडीक स्वत:च भाजपाच्या नगरसेवकांना घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजपाला सुरुंग लावण्यात खासदार महाडीक कितपत यशस्वी होतात हे लवकरच दिसून येईल.

महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी निवडून आल्यापासून त्यांची भाजपाला पूरक अशी राजकीय भूमिका राहिली आहे. महाडिक राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी नसल्याचे चित्र अनेकदा दिसते. त्यावरूनच आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांना उघड विरोध केला असून, पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच पवार हे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृति पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा मुलगा संजय मंडलिक यांना उमेदवारी देणार का या चर्चेनेही जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या अशा भेटीवरून वाद होण्याची चिन्हे आहेत.
पवार येथील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे सकाळी ८.१५ च्या सुमारास सगळ्यात अगोदर खासदार महाडिक त्यांना भेटायला आले. त्यांच्यासोबत कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे यांच्यासह भाजपाचा मित्रपक्ष असलेला ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, विरोधी पक्ष नेते किरण शिराळे,राजसिंह शेळके व शेखर कुसाळे उपस्थित होते. ही भेट झाल्यानंतर महाडिक हे पवार यांच्याच गाडीत बसून गोळिवडे(ता.पन्हाळा) या पवार यांच्या मामाच्या गावाला भेट देण्यास निघून गेले.
पक्षाच्या अधिकृत पदाधिका-यांनी दिलेल्या दौ-यानुसार पवार हे गोळिवडेला जाण्यापूर्वी खासदार महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी चहापानास जाणार होते. महाडिक भेटल्यावर चला, तुमच्या घरी जायचे आहे ना..? अशी पवार यांनी त्यांनाच विचारणा केली परंतु असे चहापान होणार असल्याच्या वृत्तपत्रांतच बातम्या असून मला कुणाकडूनच तशी सूचना नव्हती. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होईल. त्यापेक्षा गोळिवडेच्या लोकांनी जय्यत तयारी केली असल्याने आपण अगोदर तिकडे जाऊ, अशी विनंती महाडिक यांनी पवार यांना केली. त्यामुळे खासदारांच्या घरी सकाळी होणारे चहापान लांबणीवर पडले. ही माहिती खा. महाडिक यांनीच पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments