मुंबई : आदर्श इमारत घोटाळ्यावरुन अडचणीत असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांना आणखी एक झटका बसला आहे. वरळीच्या सुखदा इमारतीत अशोक चव्हाणांच्या दोन सदनिका महसूल खात्यानं जप्त केल्या आहेत.
अशोक चव्हाण यांच्या मुली सुजया आणि श्रीजया यांच्या नावावर या दोन सदनिका होत्या. सुखदा इमारतीत असलेल्या या सदनिका माजी आमदार बाबुराव पाटील आणि नारायण पाटील यांच्या नावावर होत्या. खरंतर नियमानुसार आमदारांना या सदनिका विकता येत नाही तर त्या फक्त आपल्याच कुटुंबातील सदस्यांना हस्तांतरित करता येतात. त्यामुळे या सदनिका हस्तांतरित करताना अशोक चव्हाणांच्या दोन्ही मुलींना संबंधित आमदारांच्या नातेवाईक असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं. तपासाअंती जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करत या दोन्ही सदनिकांवर जप्तीची कारवाई केली.