लासलगाव़: ऐन सणासुदीच्या दिवसात जनता महागाईने त्रस्त असतांना त्यामध्ये दिवाळीच्या तोंडावरच कांदा रडवण्याची चिन्हे आहेत. दिवाळीतच कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. दिवाळीपर्यंत हे दर आणखी वाढतील, असा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढत असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. लासलगाव एपीएमसीमध्ये गेल्या १० दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये सरासरी ८० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारी लासलगाव कांदा बाजारपेठेतील व्यवहार सुरु होताच कांद्याचे दर २१.३३ टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी कांद्याचे दर प्रति क्विंटल २,०२० रुपये इतके होते. सोमवारी कांद्याच्या दरांनी उसळी घेतली आणि ते २,४५३ रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहोचले. घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्याचा परिणाम काही दिवसांमध्ये किरकोळ बाजारातील विक्रीवरही पाहायला मिळेल. नाशिकमधील किरकोळ बाजारात सध्या कांद्याचा दर ३० रुपये प्रति किलो आहे. थोड्याच दिवसांमध्ये हा दर ३५ रुपये प्रति किलोवर जाऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या इतर भागांसह देशभरात कांद्याचा दर ५० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
‘दक्षिण भारतातून कांद्याला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत,’ अशी माहिती लासलगाव एपीएमसीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली. दिवाळीच्या कालावधीत लासलगावसहित कांद्याचे व्यवहार करणाऱ्या इतर बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर वाढवले आहेत.