नांदेड:- काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
काँग्रेस पक्ष ७० वर्षे सत्तेत होता तरीही देशातील गरीबांना घरे मिळाली नाहीत. एकट्या नांदेडात ५० हजार लोक बेघर आहेत. नरकयातना भोगत ते जगत आहेत. त्यांचे हाल अशोक चव्हाणांना दिसत नाहीत का? प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मुंबईत बरेच फ्लॅट आहेत. मात्र नांदेडातील बेघर जनतेच्या डोक्यावर छत असावे असे त्यांना वाटत नाही. मी नांदेडात आलो तेव्हा, ‘काँग्रेसचे नाते विकासाशी’ असा फलक वाचला. काँग्रेस आणि विकास यांचा काय संबंध? नांदेडला मागे ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर अशोक चव्हाणांनी केले असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
काँग्रेसच्या हातात देशाची सत्ता ७० वर्षे होती मात्र देशातील गरीबांचे आणि वंचितांचे प्रश्न तसेच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील गरीबांचा विचार करत आहेत. २०२२ पर्यंत सगळ्यांना घर मिळाले पाहिजे हा त्यांचा ध्यास आहे. त्यादृष्टीने कामालाही सुरुवात झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नांदेडचा विकास केला अशा वल्गना करता? एकदा नांदेडमधील रस्त्यांची अवस्था बघा. काँग्रेसला सत्ता हवी आहे ते पैसे खाण्यासाठीच. मी नागपुरात ५०० कोटींचा निधी दिला. नांदेडपेक्षा पाचपट मोठे शहर नागपूर आहे तीस लाखांची लोकसंख्या त्या शहरात आहे तिथले रस्ते जाऊन बघा. नांदेडमध्ये ३०० कोटी रुपये जरी रस्त्यांसाठी खर्च केले असते तर आज ही अवस्था नसती असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. नांदेडमध्ये विकासकामे करतो असे सांगत काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केला, पैसे हडप केले.
जनतेसाठी काँग्रेसची नियत स्वच्छ नाही म्हणूनच नांदेडची अवस्था बकाल झाली. मागील साडेतीन वर्षात राज्य सरकारने नांदेड महापालिकेला विकासकामांसाठी बराच निधी दिला मात्र तो गेला कुठे ते ठाऊक नाही असे म्हणत महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले. आता ११ तारखेला नांदेड महापालिकेची निवडणूक होणार आहे. यावेळी नांदेडची जनता कोणाला मत देऊन सत्तेवर आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज झालेल्या प्रचारसभेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली.