कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र तिचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप ऑनलाइनमध्येच अडकली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत २०१७ पर्यंतची कर्जमाफी करून घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवार दिला.
नांदेड-वाघाळा महानगपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची प्रचारसभा रविवारी नांदेडमध्ये झाली त्यावेळी उध्दव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर ताशेरे ओढले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल करण्याच्या सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. “कर्जमाफीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप ऑनलाइनमध्येच अडकली आहे. मात्र २०१७ पर्यंतची कर्जमाफी झालीच पाहिजे,” असे ते म्हणाले.
भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावही उद्धव ठाकरेंची टीका केली. “राज्य सरकारच्या कारभारामुळे राज्यातून विकासासोबत प्रकाशही गायब झाला आहे. अंधाराचे राज्य निर्माण झाले आहे. दुसरीकडे सरकारकडून सौभाग्य योजनेची घोषणा झाली आहे. पण आधी वीज तर द्या, असा टोला त्यांनी लगावला.” सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडे तीन वर्षांनंतर आपली शाळा आठवली आहे. असा चिमटा उद्धव यांनी काढला.
नांदेडमध्ये भाजपाला मदत करणारे आमदार प्रताप चिखलीकर यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली,” सर्वत्र सत्ता मिळवूनही भाजपाला नांदेडमध्ये उमेदवार सापडलेले नाहीत. भाजपाच्या लाटेतही केवळ शिवसैनिक म्हणून मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. आता नांदेडमध्ये वाघांना मत द्यायचे की बेडकांना हे तुम्ही ठरवा. शिवसेनेच्या वाघांनाच मत द्या, असे आवहनही. त्यांनी केले.” तसेच राज्यातील सरकारला वाचवणारे हात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असल्याची टीकाही त्यांनी केली. याआधी, सण कसे साजरे करायचे, असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे, कारण लक्ष्मी केंद्राने ओरबाडून नेली आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यावेळी उद्धव ठाकरे जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली. सरकारने दिवाळीची भेट दिली असे चित्र उभे करण्यात आले आहे. दिवाळीत त्रास देणार नाही ही मोदींची भेट असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.