skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाणांच्या मुलींच्या फ्लॅटची जप्ती झालीच नाही!

अशोक चव्हाणांच्या मुलींच्या फ्लॅटची जप्ती झालीच नाही!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींचे शुभदा सोसायटीमधील फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली होती. मात्र, मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषद संपल्यानंतर पाटील यांनी एक कागद दाखवून ‘अशोक चव्हाण यांनी सुखदा सोसायटीत फ्लॅट घेताना कसा भ्रष्टाचार केला आहे’, याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. आदर्श गृहनिर्माण सोसायटीतील भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्रिपद गमावावे लागलेल्या चव्हाणांवरील या नव्या आरोपामुळे सनसनाटी निर्माण झाली.

बाबूराव माणिकराव पाटील व नारायण गिरामजी पाटील या माजी आमदारांनी सुजया अशोक चव्हाण व श्रीजया अशोक चव्हाण यांना आपले वारसदार नेमून सुखदा सोसायटीत फ्लॅट दिले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाला होता. मात्र, आता दोन्ही फ्लॅट महसूल विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगताच ही ब्रेकिंग न्यूज सर्वत्र प्रसारित झाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पत्रकारांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांच्याशी संपर्क साधला. त्यावर ‘फ्लॅट ताब्यात घेण्याचे आदेश आमच्या कार्यालयातून निघालेले नाहीत. अशी कारवाई झाल्याची माहितीही माझ्याकडे आलेली नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

संभ्रम पसरवण्याचा भाजपचा डाव
अशोक चव्हाण यांच्यावर आधीच आदर्श प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ११ आॅक्टोबरला होणाऱ्या नांदेड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन आरोप करून चव्हाणांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

माझे फ्लॅट नियमानुसारच; अशोक चव्हाणांचा दावा
सुखदा सोसायटीमधील माझे फ्लॅट नियमानुसार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या फ्लॅटच्या संदर्भात मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा अन्य कोणीही कारवाई केली नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच मला फोनवरून दिली, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments