पुणे: सरकारकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये समाधानी असून बोनसच्या रुपात अतिरिक्त रक्कम स्वीकारत नाही, असे सांगत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांचा बोनससंदर्भातील तिढा सोडवला. यावेळी त्यांनी अधिकारी वर्गाने बोनस घेऊ नये, असे आवाहन देखील केले.
नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना दिवाळीचा बोनस घेतला नव्हता. यावेळी माझ्यासोबत कार्यरत अधिकाऱ्यांनी बोनस नाकारला होता, असे सांगत त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये, असे आवाहन केले. यासाठी कोणालाही सक्ती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा बोनससंदर्भात मुंढे यांनी शुक्रवारी पीएमपीएमएल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, कर्मचारी वर्गाला सानुग्रह अनुदान आणि सर्व रक्कम मिळून साधारण ३२ कोटी द्यावे लागणार आहेत. यातील १९ कोटी रक्कम पुणे महापालिका तर १२ कोटी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दिवाळीत पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतील, असे ही मुढें यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याला संचलन तूट दिली जाते. यातून दरवर्षी दिवाळी सणाला पीएमपीएमएल प्रशासनास वेतनाच्या ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि बक्षीस म्हणून १२ हजार रुपये दिले जातात. मात्र यंदा मुंढे यांनी आर्थिक तुटीचे कारण देऊन सानुग्रह अनुदान आणि बक्षीस देण्यास नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे कामगारामध्ये नाराजी निर्माण झाली.