Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार; देशमुख पडणार...

अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार; देशमुख पडणार तुरुंगातून बाहेर

न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी १२ डिसेंबर रोजी देशमुख यांना जामीन मंजूर केला होता, परंतु सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितल्याने १० दिवसांसाठी या आदेशाला स्थगिती दिली.

Maharashtra Anil Deshmukh CBI Bombay High Court
Image: PTI

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे, अनिल देशमुख बुधवारी तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी १२ डिसेंबर रोजी देशमुख यांना जामीन मंजूर केला होता, परंतु सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितल्याने १० दिवसांसाठी या आदेशाला स्थगिती दिली. यानंतर, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु न्यायालय सुट्टीसाठी बंद असल्याने जानेवारी २०२३ मध्येच अपीलावर सुनावणी होईल. सीबीआयच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात २७ डिसेंबरपर्यंत स्थगिती वाढवली होती.मंगळवारी एजन्सीने आणखी एक मुदतवाढ मागितली.

देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आणि इंदरपाल सिंग यांनी दावा केला की, “सीबीआय हायकोर्टाच्या आधीच्या आदेशाला “ओव्हररेच” करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यात म्हटले होते की कोणत्याही परिस्थितीत आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही.”

हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर “आणखी मुदतवाढ दिली जाऊ शकत नाही” असे सांगितले. न्यायालयाने स्थगिती वाढवण्यास नकार दिल्याने देशमुख यांची बुधवारी जामिनावर सुटका होऊ शकते, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

देशमुख यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने असे नमूद केले होते की, निलंबित केलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी कोर्टात दिलेला जवाब वगळता, सीबीआयने नोंदवलेल्या कोणत्याही साक्षीत असे दिसून आले नाही की, देशमुख यांच्या इशार्‍यावर मुंबईतील बारमालकांकडून पैसे उकळले जात होते.

गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. वैद्यकीय कारणास्तव आणि खटल्यातील गुणवत्तेवर त्यांनी जामीन मागितला.

या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी मार्च २०२१ मध्ये आरोप केला होता की तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते.

गेल्या वर्षी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांनीही असेच आरोप केले होते.

एप्रिल २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले. या चौकशीच्या आधारे सीबीआयने देशमुख आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला.

 

Web Title: Anil Deshmukh yanchya jaaminala sthagiti denyas Mumbai Uchcha Nyayalayacha nakar; Deshmukh padnar turungatun baher

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments