Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रग्राहक कार्यकर्त्यांमार्फत ग्राहक संरक्षणाच्या

ग्राहक कार्यकर्त्यांमार्फत ग्राहक संरक्षणाच्या

कायद्याचा सकारात्मक वापर व्हावा

मुंबई, दि. 23 : ग्राहकांचे हित जपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याचा वापर सकारात्मक करण्याची जबाबदारी ग्राहक कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ग्राहक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मंत्री श्री. बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष अरूण देशपांडे, अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव महेश पाठक, वैधमापन शास्त्र नियंत्रक संदीप बिष्णोई, शिधावाटप नियंत्रक दिलीप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, ऑनलाईन व्यवहार आणि संगणकीकरण यामुळे कारभारात पारदर्शकता आली असून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. सुमारे दहा लाख बोगस आणि दुबार रेशन कार्ड रद्द केल्यामुळे साडे तीन लाख मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे. या वाचलेल्या धान्यातून आता मागेल त्याला धान्य देणे शक्य होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत अनेक लोकोपयोगी योजना परिणामकारकरित्या राबविण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यातील सर्व स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले. धान्याची होणारी चोरी रोखण्यात यामुळे यश आले आहे. ग्राहकांना ऑनलाईन सुविधेद्वारे बॅंकींग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल यस बॅंक आणि ओएसीस या संस्थाचे आभार व्यक्त केले.

यावेळी प्रास्ताविक करताना श्री. पाठक यांनी रेशन दुकानदारांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल सांगितले, ते म्हणाले, सध्या यस बॅंक या बॅंकेचे व्यवसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांना सेवा देता येणार आहे. यासाठी बॅंकेतर्फे कमिशनही दुकानदारांना मिळणार आहे. यस बॅंकेप्रमाणे इतर बॅंकेकडून प्रस्ताव आल्यास शासन स्वागत करेल. यापुढे टिकीट बुकींग किंवा मोबाईलचे रिचार्ज यासारख्या सुविधा देता येणार आहेत. याशिवाय रेशन दुकानदारांकडील पॉस मशिनमार्फत आधार एनॅबल्ड पे सिस्टीममधून कॅशलेस व्यवहार करता येणार आहेत.

यावेळी वैधमापन नियंत्रक संदीप बिष्णोई म्हणाले, ग्राहकांच्या हितासाठी असलेल्या कायद्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवण्याचे काम करणे आवश्यक आहे. वैधमापनशी संबंधित अर्ज, परवानग्या तसेच तक्रारींसाठी सर्व प्रक्रीया ऑनलाईन झाली असून तक्रारींची दखल घेउन चोविस तासाच्या आत निवारण करण्यात येते. असेही त्यांनी सांगितले.

ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्राहक मेळावा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन शिधावाटप नियंत्रक दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यस बॅंकेमार्फत बॅंकेची सेवा रेशन दुकानदारांमार्फत देण्याच्या सुविधेचाही शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील सुमारे आठशे प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी रेशन दुकानामध्ये बँकींग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे यस बँक रेशन दुकानदारांसोबत सहयोगी बँक म्हणून काम करणार आहे. रेशन दुकानात यापुढे पैसे पाठवणे, रक्कम तपासणी आदी प्रक्रिया केल्या जातील. सुरुवातीच्या काळात १७ हजार रेशन दुकानात ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवेसाठी रेशन दुकानदारांना काही प्रमाणात मोबदला दिला जाणार आहे.

यावेळी ग्राहक चळवळीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राजू आसनकर (कल्याण), अरुण नामदेव यादव( कोल्हापूर), महेश सूर्यकांत ढवळे( लातूर), बप्पासाहेब सीताराम औटी( पुणे), नेहा जोशी(रत्नागिरी), हरीष मारू( नाशिक), अभय खेडकर( वाशिम), अनुपमा दाते( यवतमाळ), रवींद्र पिंगळेकर(औरंगाबाद), किशोर ठोसर (मुंबई), नामदेव माहुलकर( मुंबई), पांडुरंग पटवर्धन( रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

– अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments