राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंजुरी

मुंबई, राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणामुळे कृषी उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेपासून थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजारपेठ उपलब्ध होण्यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

राज्यात वेगाने होणारे नागरीकरण, देशातील सर्वाधिक औद्योगीकरण, नागरिकांचे उंचावणारे जीवनमान, देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीत होणारी वाढ यातून अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. गेल्या अर्थसंकल्पात कृषि प्रक्रियेसाठी नवीन योजना घोषित करण्यात आली असून ती 20 जून 2017 पासून मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना या नावाने अस्तित्वात आली आहे. याअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणामुळे कृषी उद्योगांत गुंतवणूक होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व फलोत्पादन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ कार्यरत राहील.यामध्ये पणनमंत्री, उद्योगमंत्री, पशुसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री, सहकार मंत्री, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री आणि संबंधित अधिकारी हे सदस्य असतील.

या धोरणामध्ये विविध बाबींचा समावेश आहे. कृषी प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी दोन स्वतंत्र संचालनालये स्थापन करण्यात येतील. अन्न प्रक्रिया उद्योगांना पायाभूत सुविधा देण्यासाठी उद्योग आयुक्तांच्या कार्यालयात संचालक दर्जाचे अधिकारी नेमण्यात येतील. केंद्र व राज्याच्या विविध अनुदानांचा लाभ मिळवून देणे, उद्योगांना नवीन बाजारपेठ व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे इत्यादींसाठी कृषी आयुक्तालयामध्ये अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणुकदारांना सर्व संबंधित सेवा पुरविण्यासाठी जिल्हा स्तरावर ई-प्लॅटफॉर्म आधारित एक खिडकी पद्धत सुरु करण्यात येणार आहे.

कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर या धोरणांतर्गत भर दिला जाईल. संबंधित भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनावर आधारित अन्न प्रक्रियेवर भर देऊन समूह (क्लस्टर्स) विकसित केले जाणार आहेत. राज्याचा कृषी विभाग केंद्राच्या सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मदतीने या समुहांचा विकास करणार आहे. त्यातून अन्न प्रक्रिया उद्योग, मेगा फूड पार्क यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. परिणामी जोखीम कमी होऊन वैयक्तिक आर्थिक फायदा मिळेल.

कृषी प्रक्रिया उद्योजकांना गुणवत्तापूर्ण कच्चा माल उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) कायद्यामध्ये सुधारणा करुन कृषी उत्पादनाच्या मूल्य वाढीस तथा अन्न प्रक्रिया उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदींचा समावेश करण्यात येईल. दर्जेदार कच्चा माल सहज उपलब्ध व्हावा म्हणून राज्यात गट शेतीची नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची जमीन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने व्यापारी तत्त्वावर कृषी प्रक्रिया उद्योजकांना उपलब्ध झाल्यास कृषी उत्पादन घेता येईल, ही बाब लक्षात घेऊन कायद्यात योग्य ते बदल करण्यात येतील.

गावठाणाच्या बाहेर सूक्ष्म, लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना अकृषिक परवानगीची आवश्यकता शिथिल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 मधील कलम 42 च्या तरतुदीमध्ये सुधारणा केली जाईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची व्याख्या ही सूक्ष्म, लघु व मध्यम विकास अधिनियम-2006 च्या तरतुदीप्रमाणे राहणार आहे.

कृषी प्रक्रिया उद्योगाचा विकास करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने विकसित करण्यात येतील. मालवाहतूक क्षेत्रात अन्न प्रक्रिया व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, नाशवंत मालाच्या साठवणुकीसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे आणि रेल्वेच्या ठिकाणी समर्पित कार्गो हबची स्थापना करण्यात येईल. स्थानिक अन्न प्रक्रिया उद्योगांना आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. वाहतूक खर्चात बचत होऊन देशातील संपूर्ण लॉजिस्टिक नेटवर्कची क्षमता वाढणे अपेक्षित आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्राहकांनाही योग्य किंमतीत उत्पादन मिळेल.तसेच  शंभर टक्के महिला गटांद्वारे स्थापन होणाऱ्या प्रकल्पांना मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेसह राज्य पुरस्कृत सर्व अन्न प्रक्रिया योजनांमध्ये अग्रक्रम देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून त्यास पूरक ठरणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम कृषी प्रक्रिया उद्योगांना कमी दराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम प्रक्रिया उद्योगांना शेतीचा दर्जा देण्यात येईल. शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडता यावे तसेच गुंतवणुकीला चालना मिळावी म्हणून संबंधित उद्योगांना प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी वर्गीकरण, गुणांकन आणि पॅकेजिंगसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल व प्रक्रिया झालेल्या अंतिम उत्पादनाची गुणवत्ता टिकविण्यासाठी अत्याधुनिक शीतसाखळी आवश्यक असते. हे लक्षात घेऊन 2020 पर्यंत अन्न प्रक्रिया उद्योग व निगडित शीतसाखळी प्रकल्पांसाठी वास्तविक खर्चावर आधारित (At Cost) विद्युत शुल्क लागू करण्यात येईल.

शेतमालावर आधारित सुक्ष्म, लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना अन्न प्रक्रियेसाठी लागणारा पाणी उपसा परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र, मोठे उद्योग व मेगा फूडपार्क अन्न प्रक्रिया सुविधांच्या क्लस्टरमध्ये सामाईक सुविधा म्हणून पाणी उपसा प्रकरणावर निश्चित मुदतीत निर्णय घेण्याची कायदेशीर तरतूद केली जाणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योग हे कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर तसेच हंगामी स्वरुपाचे असतात. असे असले तरी कामगारांशी निगडित मुद्यांबाबत विवाद निर्माण झाल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून निश्चित कालावधीत निर्णय देण्याची तरतूद कामगार कायद्यात करण्यात येईल.

प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने, अन्न प्रक्रिया उद्योगांनी गुणांकन तपासणी व अंमलबजावणी योग्यरित्या करावी म्हणून देखरेख करणारी सक्षम यंत्रणा प्रदूषण नियंत्रण विभागाच्या सहाय्याने निर्माण करण्यात येईल. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडमध्ये (बीओडी) सुधारणा करुन अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश ग्रीन कॅटेगरीमध्ये करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग किंवा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मान्यता प्राप्त संस्थांकडून उद्योगाशी संबंधित कौशल्य प्रमाणपत्र प्राप्त करुन घेता येईल.

मुंबईची पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार

मुंबई,मुंबईतील मेट्रो जाळ्याच्या विस्तारीकरणाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो मार्ग क्र. 6 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास व त्याच्या अंमलबजावणीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या 14.47 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गाच्या उभारणी अंतर्गत 118 कि.मी. लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गाची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आलेल्या मंजुरीनुसार स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्गापासून जोगेश्वरी-विक्रोळी मार्गाद्वारे कांजूर मार्ग पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत होता. परंतु, पश्चिम उपनगरातील स्वामी समर्थ नगर क्षेत्रातून जाणारा हा मेट्रो मार्ग, मेट्रो मार्ग- 2 अ ला जोडून संपूर्ण पूर्व-पश्चिम मार्गांची जोडणी तयार करण्याच्या उद्देशाने हा मेट्रो मार्ग स्वामी समर्थ नगर पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने बृहत् आराखड्यातील मेट्रो मार्ग-6 स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो मार्गाचा सुधारित प्रकल्प अहवाल ऑक्टोबर 2016 मध्ये सादर केला. प्राधिकरणाच्या 19 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या 141 व्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून प्राधिकरणाने शासनाची मान्यता घेण्याची शिफारस केली आहे. मेट्रो मार्ग-2अ दहिसर (पूर्व)-डी.एन.नगर (18.6 कि.मी.) प्रमाणेच मेट्रो मार्ग-6-स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी (14.47 कि.मी.) असे दोन्ही मार्ग मिळून सुमारे 33 कि.मी. लांबीचा मेट्रो प्रकल्प दिल्ली मेट्रो महामंडळामार्फत Deposit work म्हणून राबविण्याचे प्रस्तावित आहे.

या पूर्णत: उन्नत असलेल्या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 14.47 कि.मी. राहणार असून त्यात 13 स्थानके असतील. स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, जोगेश्वरी (प.), जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, श्याम नगर, महाकाली लेणी, सिप्झ गाव, साकी विहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (प.) आणि विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) अशी ही स्थानके असून कांजुरमार्ग येथे कार डेपो नियोजित आहे. मार्च 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची एकूण किंमत 6 हजार 716 कोटी गृहित धरण्यात आली आहे. त्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सहभाग 3 हजार 195 कोटी आणि राज्य शासनाचा सहभाग 1 हजार 820 कोटी तर 1 हजार 700 कोटींचा निधी कर्ज स्वरुपातील असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये प्रतिदिन साडेसहा लाख प्रवासी वाहतुकीची क्षमता निर्माण होईल.  या मार्गावर सुरुवातीचे किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 30 रुपये असेल.

मेट्रो मार्ग-6 हा उपनगरीय रेल्वेशी जोडला जाणार असल्याने तसेच मेट्रो मार्ग -2अ, 7, 3 आणि मेट्रो मार्ग-4 या मेट्रो मार्गामुळे पश्चिम व पूर्व उपनगरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. स्वामी समर्थ नगर, सिप्झ, एल ॲन्ड टी यासारखी वाणिज्यिक क्षेत्रे आणि आय.आय.टी. सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेस हा मेट्रो मार्ग फायदेशीर ठरेल. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येणार आहेत. या मार्गामुळे मेट्रो मार्ग-२ अ (दहिसर-डी.एन.नगर), मेट्रो मार्ग-७ (दहिसर-अंधेरी), मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) व मेट्रो मार्ग-४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) या मेट्रो मार्गांशी प्रवासी जोडले जाणार आहेत.  सन 2021 पर्यंत 6.50 लाख तर 2031 पर्यंत सुमारे 7.70 लाख प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासाचे फायदे उपलब्ध होतील. तसेच, वेळेची बचत, इंधन बचत, वाहन खर्च आणि प्रवासास लागणाऱ्या वेळेमध्ये बचत होऊन रस्त्यावरील दुर्घटना, ध्वनी व हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

मराठा समाजातील तरुणांसाठी व्याज सवलतीची नवीन योजना तयार करा- महसूलमंत्री पाटील

मुंबई: मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज वितरणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीची नवीन योजना तयार करण्याच्या सूचना आज झालेल्या मराठा मोर्चाच्या मागण्यासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची तिसरी बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी पाटील म्हणाले, मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखापर्यंत करण्यासंदर्भातही महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. तसेच गट प्रकल्प कर्ज योजनेचा आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरात लवकर या योजना तयार करून सादर कराव्यात. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण सुरू करावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सक्षमपणे सुरू राहण्यासाठी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

दुध उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन असेल-दुग्धविकासमंत्री जानकर

मुंबई दुध उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक पूर्वी पहिला होता. परंतु सध्या बारावा आहे.एक वर्षात राज्याचा क्रमांक पुन्हा पहिला असेल असा दावा राज्याचे   पशूसंवर्धन  व  दूग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केला.आरे-ए ला पुन्हा सर्वोच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त करून देऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मंत्रालय पत्रकार कक्षात जानकर हे पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात दररोज दीड कोटी रूपये किंमतीचे दूध, अंडी, व मत्स्यबीज बाहेरील राज्यातून येते. त्यावर मात करून राज्यात त्यांचे उत्पादन वाढविण्यावर शासनाचा भर राहील असे त्यांनी स्पष्ट  केले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात केंद्र सरकारकडून संरक्षण वगृह विभागासाठी दूध व अंडी पुरविण्याची परवानगी दिली आहे व महाराष्ट्र हे अशी परवानगी मिळालेले एकमेव राज्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील  दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारची जबाबदारी आहेच पण ग्राहक म्हणून शहरी लोकांचीही जबाबदारी आहे. घरच्याघरी ग्राहकांना दूधभेसळ तपासता यावी म्हणून शाासनातर्फे  तपासणी पेपरचा पुरवठा केला जाईल.भेसळ करणा-यांवर आपण आजवर शंभरहून अधिक धाडी घातल्या अशीही माहिती त्यांनी दिली.जनावरांना  उपचार व चिकित्सा लवकर मिळावी 349 वाहने उपलब्ध करू  कोणत्याही भागातून जिल्ह्यातून मेसेज येताच वाड्या वस्तीवरही पशूवैद्यकासह वाहन तेथे पोहचेल. टाटा समूहाच्या  आर्थिक साहाय्यतून नवी मुंबईत कळंबोली येथे जागतिक दर्जाचे पशूचिकित्सालय उभे करण्यात येणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.त्याचवेळी राज्यात मत्स्यउत्पादनास अधिकाधिक चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच,मत्स्यबीजाचे उत्पादन येथेच व्हावे या हेतूने कोकणातील रत्नागिरी येथे विशेष बीज केंद्र उभारण्याच्या आपल्या कल्पनेस मुख्य मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली असून त्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येईल असाही दावा जानकर यांनी यावेळी बोलताना केला.

अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु बडतर्फ

मुंबई: मुंबई विदयापीठाचे ऑनलाईन पेपर तपासणीला विलंब झाल्यामुळे विदयार्थ्यांचे उशीरा निकाल लागले होते. या प्रकरणी डॉ.संजय देमुखांच्या निर्णयाविरुध्द बरीच टीका झाली होती. त्यानंतर देशमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. अखेर राज्यपालांनी देशमुखांना कुलगुरुपदावरुन मंगळवारी बडतर्फ केल्याची माहिती समोर आली.

इम्रान च्या पत्नीने त्याच्या कानाखाली मारली होती

आपल्या पतीचा पहिला चित्रपट पाहिल्यावर कोणतीही पत्नी आनंदित होते. आपल्या पतीला मिठी मारून त्याचे कौतुक करते. पण तुम्हाला माहीत आहे का, इम्रान हाश्मीचा पहिला चित्रपट पाहिल्यावर त्याची पत्नी परवीन सहानीने चक्क त्याच्या कानाखाली वाजवली होती. एवढेच नव्हे तर इम्रानच्या अनेक चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर इम्रानला कानाखाली खावी लागली आहे. इम्रान आणि त्याच्या पत्नीनेच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे.

इम्रान हाश्मी हा सिरियल किसर म्हणून ओळखला जातो. मर्डर या चित्रपटापासूनच प्रत्येक चित्रपटात आपल्याला त्याचे किसिंग सीन पाहायला मिळाले आहेत. इम्रानने एखाद्या चित्रपटात किसिंग सीन दिला नाही तर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण त्याने चित्रपटात किसिंग सीन देणे त्याच्या पत्नीला पसंत नाहीये. इम्रान आणि परवीन यांचे लव्ह मॅरेज आहे. तो या झगमगत्या दुनियेशी संबंधित असला तरी त्याच्या पत्नीचा या क्षेत्राशी काहीही संबंध नाहीये. त्याची पत्नी ही टिचर आहे. इम्रानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इम्रान आणि परवीन यांचे अफेअर होते. ती इम्रानच्या स्ट्रगलच्या काळात नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांनी साडे सहा वर्षांच्या अफेअरनंतर २००६ मध्ये लग्न केले.

इम्रानने आणि त्याच्या पत्नीने एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, परवीन ही इम्रानच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह आहे. त्यामुळे त्याने स्क्रीनवर किस करू नये असे तिने अनेकवेळा इम्रानला सांगितले आहे. पण इम्रानची इमेजच सिरियल किसरची बनल्यामुळे चित्रपटाच्या दृश्याच्या मागणीनुसार त्याने किस करणे हे गरजेचे असते. पण त्याने किस करताना परवीनने पाहिल्यावर तिची तळपायाची आग मस्तकात जाते. इम्रानचा पहिला चित्रपट पाहून तर परवीन इतकी चिडली होती की, तिने त्याच्या कानाखाली वाजवली होती. एवढेच नव्हे तर इम्रानच्या अनेक चित्रपटांच्या ट्रायल शो नंतर इम्रानचा किसिंग सीन पाहून चिडलेल्या परवीनने त्याच्या कानाखाली मारली आहे.
इम्रान आणि परवीनने मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता. इम्रानचे वडील मुस्लीम असून त्याची आई ख्रिश्चन आहे. परवीन आणि इम्रान बॉलिवूडमधील क्यूट कपलमधील एक कपल असून त्या दोघांना अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र पाहाता येते.

चित्रपटगृहात देशभक्ती सिद्ध करण्याची गरज काय ? -सुप्रीम कोर्ट

राष्ट्रगीत हा चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर चित्रपटगृहातील प्रेक्षकांना त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची गरज नाही किंवा देशभक्ति सिद्ध करण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्याची गरज नाही असा निर्णय दिला होता. आज ११ महिन्यानंतर मुख्य न्यायाधीस दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाई चंद्रचूड या तीन सदस्यीय खंडपीठाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ठिकाणी देशभक्ती दाखवण्याची कोणतीही आवश्यकता नाहीये असंही सुप्रीम कोर्टाने नमुद केलंय. सुनावणी दरम्यान अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी “भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. सर्वांना एकत्र आणण्यासाठी सिनेमागृहात राष्ट्रगीत आवश्यक आहे” असा युक्तिवाद केला. यावर कोर्टाने जर असं गरजेचं असेल तर सरकार अध्यादेश आणू शकते. पण असं का केलं नाही असा सवाल केलाय. तसंच प्रत्येक ठिकाणी देशभक्तिचं प्रदर्शन मांडण्याची आवश्यक्ता आहे का ?, चित्रपटगृह हे मनोरंजनाचे ठिकाण आहे. तुमचे सरकार आहे, तुम्ही निर्णय़ घेऊ शकतात. याचा कोर्टावर भार का आणताय असा सवालही कोर्टाने विचारलाय.

उद्या जर लोकं टी-शर्ट आणि  शॉटर्स परिधान करून चित्रपटगृहात गेले आणि राष्ट्रगिताचा अवमान झाला  असा दावाही सरकार करू शकतो अशी शक्यताही कोर्टाने वर्तवली. लोकं मनोरंजनासाठी चित्रपटगृहात जातात. लोकांना मनोरंजन पाहिजे असते.  सरकारला हवं असेल तर चित्रपटगृहचं काय इतर अन्य ठिकाणी राष्ट्रगीत सुरू करतील. पण हा निर्णय तुम्ही घ्या आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊ नका अशा शब्दात खंडपीठाने केंद्र सरकारला फटकारलं. तसंच चित्रपटगृहात जर कुणी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहिलं नाही तर त्याला देशद्रोही म्हणणं चुकीचं आहे. जर कुणाला देशभक्ति सिद्ध करायची असेल तर चित्रपटगृहात देशभक्ती दाखवण्याची गरज नाही असंही खंडपीठाने बजावलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता ९ जानेवारीला होणार आहे.

धर्मवीर आता बॉलबॉय नसणार!

नवी दिल्ली : पोलियोग्रस्त धर्मवीर पाल टीम इंडियाचा मोठा चाहता आहे. कित्येक वर्ष तो सामन्यांमध्ये बाऊंड्रीवर बॉलबॉय म्हणून दिसतो. मात्र यापुढे तो बॉलबॉय म्हणून दिसणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. धर्मवीरला आता स्टेडियममध्ये बसून मॅच पाहता येणार आहे.

पोलियोग्रस्त तरुणाला क्रिकेट सामन्यात बॉल उचलण्याचं काम करायला लावल्याबद्दल सोशल मीडियावर टीका झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने परिपत्रक काढून यापुढे धर्मवीरला बॉलबॉयची भूमिका देणार नसल्याचं जाहीर केलं. ‘क्रिकेट हे माझं आयुष्य आहे’ असं धर्मवीर म्हणतो. अनेक क्रिकेटपटूंशी त्याची वैयक्तिक ओळख आहे. २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या सामन्यातही तो बॉलबॉय होता. अंगावर तिरंगा काढून घेणारा सचिनचा सुपरफॅन सुधीर गौतम आणि धर्मवीरची सचिनने भेट घेतली होती. ‘तुमच्यासारख्या चाहत्यांमुळेच आम्ही क्रिकेट खेळू शकतो. भारतीय क्रिकेटला तुमच्यासारख्या फॅन्सची गरज आहे’ असं मास्टरब्लास्टरने त्यांना सांगितलं होतं.

१६ वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणाला बॉलबॉय ठेवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी टीकेची झोड उठवली. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये दिव्यांग तरुणांना बॉलबॉय ठेवू नका, असं सोशल मीडियावर बीसीसीआयला टॅग करुन सांगण्यात आलं.

धर्मवीर हा मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याचा रहिवासी आहे. अवघा आठ महिन्यांचा असताना त्याला पोलियोची लागण झाली. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमध्ये तो टीमचा कर्णधार होता. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी तो ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेशला गेला होता.

घरीच करा हेअर स्पा

प्रत्येकाला आपल्या केसांची काळजी असते. अशा वेळी केसही सुंदर दिसायला हवेत. बदलत्या हवामानामुळे केसांमध्ये बदल होणे साहजिकच आहे आणि चमकदार, निरोगी केसांसाठी केमिकलवाले प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. केस मुलायम आणि दाट होण्यासाठी पाहू या घरगुती उपाय-

जेव्हा केस कोरडे होतात…

कृती – पाच मोठे चमचे बेसन आणि दही दोन मोठे चमचे घ्या. त्यात ऑलिव्ह ऑइल मिस्क करा. या मिश्रणाला केसांना लावून २० मिनिटे ठेवा. आता केस शॅम्पूने धुवा. केसांना कंडिशन करायला विसरू नका.

फायदा – बेसन तुमच्या केसांना मुळांपासून मजबूत करेल, दही आणि ऑलिव्ह ऑईल केसांमधे ओलावा निर्माण करतील. केस चमकदार होतील.

अशी घ्या तेलकट केसांची काळजी

कृती – दोन मोठे चमचे बेसन घ्या. नारळाच्या दुधामध्ये मेथीचे दाणे मिश्रीत करा. या मिश्रणाने केसांचं मालिश करा आणि एक तासासाठी केस मोकळे सोडा. त्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुऊन घ्या.

फायदा – केसांचा चिकटपणा निघून जाईल. केस चमकदार आणि मजबुत होतील.

साध्या केसांची निगा राखण्यासाठी

कृती – अंड्याच्या पांढऱ्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन आणि योग्य प्रमाणात बदाम पावडर मिस्क करा.  आपल्या केसांना लावून केस अर्ध्या तासासाठी मोकळे सोडा. यानंतर केस धुऊन घ्या.

फायदा –   साध्या केसांची योग्य काळजी घेतली तर केसांची गुणवत्ता आणखी वाढू शकते.

घणसोली स्थानकात लोकलचे कपलिंग तुटले,प्रवाशांचे हाल

डोंबिवली: ट्रान्सहार्बरमार्गे ठाण्याहून पनवेलला जाणा-या लोकलचे कपलिंग तुटल्याने डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी घणसोली स्थानकात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे सव्वातास ट्रान्सहार्बरच्या डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशीरा पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. व दुरुस्तीचे काम सुरुच होते.

ठाणे स्थानकातून संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पनवेलच्या दिशेने निघालेली लोकल घणसोली स्थानकात ४.१४ च्या सुमारास पोहोचली. तेथून निघतांना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे बघणयासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. स्थानकातच ही घटना घडल्याने लोकल तातडीने रिकामी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक दुरुस्ति विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत डबे जोडण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस सव्वातासाने संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही लोकल पनवेलच्या दिशेने पुढे धावल्याची माहिती कोपरखैरणे, ठाणे लोहमार्ग पोलीसांनी दिली. संध्याकाळी घरी परतणा-या लाखो चाकरमान्यांना फटका बसला.