अर्थमंत्र्यांचा खोटारडेपणा!

अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या गोंधळाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान असल्याची सारवासारव करण्यात येते. तसे सांगून अविचारीपणाने अमलात आणलेल्या धोरणाला सावरण्याचा प्रयत्न होतो. आर्थिक अर्थव्यवस्था तीन वर्षापासून मजबूत असल्याची पोकळ डरकाळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फोडली. भारताचे चित्र आपण ६० महिन्यांत बदलू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. त्यातील ४० महिने वाहून गेले. देशाचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. तरीही आकडेवारी फेकून लोकांची फसवणूक करणे सुरूच आहे. भारताचा सकल उत्पादनाचा निर्देशांक ७ टक्के झाला असून तो वाढत आहे, असेही सांगण्यात येते. पण जीडीपीच्या वाढीमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत असतील आणि गरिबांच्या त्रासात भर पडत असेल तर ही आकडेवारी म्हणजे धूळफेकच ठरते. भारताचा विकास दर ७ टक्के तर चीनचा विकास दर ६.७ टक्के असतो; तेव्हा चीनचा विकास अधिक उंचीवरून झाला आहे हे लक्षात घेतले जात नाही. अशा स्थितीत आपली अर्थव्यवस्था वेगवान आहे असे सांगणे ही फसवणूक करण्यासारखे आहे. भारताचे दरडोई उत्पन्न १८५० डॉलर्स आहे तर चीनचे ते ८५०० डॉलर्स आहे. जीडीपीमुळे तळातील लोकांचा काय फायदा झाला हे अर्थतज्ज्ञांना दाखवून देता आले पाहिजे. देशातील २४.७ कोटींपैकी १६.८ कोटी कुटुंबे ही ग्रामीण भागांतील तर ७.९ कोटी शहरातील आहेत. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यातील ग्रामीण भागात लोकसंख्येपैकी (७४.१८ कोटी) ९२ टक्के लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांहून कमी आहे. शहरातील २६.४ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. एकूणच ८४ कोटी जनता कसाबसा उदरनिर्वाह करते. भाजपाच्या एका नेत्याने देशाचा विकास दर ५.७ टक्के नसून तो ३.७ टक्के असल्याचे म्हटले. त्यांचा दावा सरकार फेटाळून लावू शकते. अशा वादातून राजकारणाची पातळी घसरू शकते, पण ज्यांनी उदरनिर्वाहाची साधने गमावली त्यांच्या त्रासात मात्र भरच पडते आहे. त्यांची पोटे टीव्हीवरील आकड्यांनी भरणारी नाही. लोकांचे दारिद्र्य जागच्या जागी असताना आपण वेगवान अर्थव्यवस्थेच्या गोष्टी करतो. काही लोक सुखी जीवन जगत आहेत, हे नाकारता येणार नाही. पण त्यांची संख्या लोकसंख्येच्या १ टक्कासुद्धा नाही. पण हे लोक देशातील ५० टक्के संपदेवर नियंत्रण ठेवतात. बाकीच्या लोकांत सरकारी कर्मचाºयांचा समावेश होतो. त्यांच्यातील प्रामाणिक कर्मचा-यांना अत्यंत साधेपणाचे जीवन जगावे लागते. त्यांना महागड्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी स्वत:च्या मुलांना पाठविता येत नाही. चांगली आरोग्यसेवा त्यांना परवडत नाही. ग्राहकांना भुलविणाऱ्या जाहिरातीतील वस्तू त्यांना परवडणा-या नसतात. त्यामुळे सतत काहीतरी गमावल्याची जाणीव त्यांना भेडसावत असते. त्यामुळे मध्यमवर्गाच्या नैतिक मूल्यांचा -हास होतो. त्यातून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढीस लागत आहे. सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक नवे धोरण आपण विकसित केले पाहिजे, याकडे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अचूक लक्ष वेधले आहे. आर्थिक विकास साधत असताना आर्थिक विषमता नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला पाहिजे. समाजातील वंचित घटकातील असंतोष जाणून घेण्याची पद्धत आपण विकसित केली पाहिजे. जीडीपीचे मोजमाप करणा-या घटकात बदल करून उद्याची चिंता असणा-यांच्या जीवनात आपण बदल घडवू शकणार नाही. राजकारण्यांना आकड्यांच्या ख-या-खोट्याविषयी चिंता नसते. त्यांना त्यातून काढलेले निष्कर्ष महत्त्वाचे असतात. त्यांच्या आधारे ते लोकांना स्वप्ने विकत असतात. राजकारणी हे लोकांना ‘आशा विकणा-या व्यापा-यांसारखे असतात’ असे नेपोलियनने म्हटले आहे. गरीब जनता या पोकळ आश्वासनांना बळी पडते. पण राजकारणी मात्र त्यामुळे काहीच गमावीत नसतात. समानतेच्या तत्त्वाने सर्वांना चांगले जीवन जगण्याची संधी देणे हाच आपल्या सर्वांचा मंत्र असायला हवा. सरकारने शब्दांचा खेळ बंद करुन देशाची आर्थिक घडी बसवावी अन्यथा देशावर आपलेले महासंकट हे अजून खड्यात घातल्या शिवाय राहणार नाही.

वजन वाढवण्यासाठी हे आवश्य खा!

मुंबई : वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. खालील ७ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता.

पीनट बटर – तुम्हाला नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा उत्तम पर्याय आहे. दररोजच्या आहात एक चमचा पीनट बटर खा.

अंडी – अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन डी आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. वजन वाढवण्यासाठी अंडी खा.

सॅलमन – सॅलमनचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता. यासाठी सॅलमन ऑलिव्ह ऑईल आणि बटरमध्ये शिजवा.

बटाटे – बटाट्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते.

मिक्स ड्रायफ्रुट – सुका मेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सुका मेव्यामध्ये ५००-६०० कॅलरीज असतात. तसेच यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटामिन ई आणि फायबर असतात.

चीज – प्रत्येकी १० ग्रॅम चीजमध्ये ४०० कॅलरीज असतात. चीजमध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फॅट आणि कॅल्शियम असते. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही दररोज चीज खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

केळी – वजन वाढवण्याचा मस्त आणि स्वस्त उपाय म्हणजे केळी. केळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये १२० कॅलरीज असतात. दररोजच्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.

वजन कमी करायचे तर हिरड्याचा वापर करा!

मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.

हिरडा ही औषधी वनस्पती आहे. त्रिफला चूर्णामध्ये हिरड्याचा वापर केला जातो. याचे अनेक औषधी गुणही आहेत. ज्यांना सतत पोटाचे विकार होत असतात त्यांच्यासाठी हिरडा हे  वरदान आहे. पाचनशक्ती सुधारण्यासाठी, गॅसचा त्रास, पोट साफ ठेवण्यासाठी हिरड्याचा वापर होतो. मात्र याचबरोबर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हिरड्याचा वापर करु शकता.

असा करा वापर

३-६ ग्रॅम हिरडा पावडर पाण्यात टाकून उकळवा. ही पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळू शकते.

पाणी उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

गाळलेल्या पाण्यात मध मिसळा.

हे मिश्रण दररोज रिकाम्या पोटी घ्या.

चित्रपटगृहातच देशभक्ती का दाखवायची – ओवेसी

नवी दिल्ली: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणारे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याची सक्ती न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोणाला देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहण्याची गरज नाही. चित्रपटगृहात देशभक्ती का दाखवयाची, असा सवाल करत कोण किती देशभक्त आहे, हे यावरून समजत नाही, असेही त्यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना सर्वच पक्षांची बाजू ध्यानात घेतली आहे. व्यक्ती हा मनोरंजनासाठी चित्रपटगृहात जातो. अशावेळी राष्ट्रगीतासाठी बळजबरीने उभा करणे किंवा यासाठी कोणाला त्रास देणे योग्य नाही. जर एखादा विशेष दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन असेल त्यावेळी नागरिक स्वेच्छेने राष्ट्रगीतावेळी उभे राहतात, असे ते म्हणाले.

कोणाला आपली देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहण्याची गरज नाही. कोण किती देशभक्त आहे, हे समजूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला होता. केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता.

तर आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल?

मुंबई – आयपीएलच्या पुढच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ कमबॅक करणार आहेत. सट्टेबाजीच्या प्रकरणातील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या दोन्ही संघांनी बंदीचा दोनवर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. सध्या या दोन्ही संघातील खेळाडू रायजिंग पुणे सुपरजायंटस आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळतात. पुणे आणि गुजरात संघांमध्ये असलेले काही खेळाडू चेन्नई आणि राजस्थानला परत मिळू शकतात.

आयपीएलच्या संचालन परिषदेने तसा प्रस्ताव ठेवला आहे. पुढच्या महिन्यात होणा-या फ्रेंचायजींच्या बैठकीत यावर निर्णय होईल. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर महेंद्रसिंह धोनी पुण्याऐवजी पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. तीन खेळाडू जुन्या संघाकडे कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यात एक भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास सध्या पुणे आणि गुजरातकडून खेळणारे तीन खेळाडू चेन्नई आणि राजस्थानला परत मिळू शकतात.

आम्ही संघमालकांसमोर हा प्रस्ताव मांडू असे आयपीएलच्या संचालन परिषदेच्या सदस्याने मंगळवारच्या बैठकीनंतर सांगितले. या प्रस्तावामुळे मागच्या दोन मोसमात पुण्याकडून खेळणारा धोनी चेन्नईला मिळेल. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की, तीन ते पाच खेळाडून जुन्या संघांकडे कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. फ्रेंचायजीं बहुमताने काय ठरवतात त्यावर अवलंबून आहे.

धोनीचे चेन्नई संघाबरोबर जे नाते आहे तसे नाते पुण्याच्या संघाबरोबर दोनवर्षात जमू शकले नाही. यावर्षीच्या आयपीएलच्या मोसमात पुणे संघाचे मालक  हर्ष गोयंका यांनी धोनीच्या कामगिरीवरुन त्याला लक्ष्य केले होते. त्याच्यापेक्षा पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ किती सरस आहे अशी टि्वटरवरुन टीकाही केली होती.

आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, “स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं,  स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता” असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.

नोटाबंदीची वर्षपूर्तीला १८ विरोधीपक्ष ‘काळा दिवस’ पाळणार!

नवी दिल्ली: नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे.  नोटाबंदी निर्णय ‘सर्वात मोठा घोटाळा’ असल्याचे सांगत ८ नोव्हेंबरला विरोधी पक्षांकडून हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. शिवाय, या दिवशी देशभरात निदर्शनंही करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभर गोंधळ उडाला. केंद्र सरकारच्या निर्णयाचा असंघटीत क्षेत्र व शेतक-यांना मोठा फटका बसला, त्याचा निषेध करणे, त्यांना नुकसान भरपाई मिळणे व सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी देशभर विविध संघटना-पक्षांकडून ८ नोव्हेंबरला नोटबंदी निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात येणार आहेत.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० रूपये आणि ५०० रूपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी विरोधकांनी नोटाबंदी निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, बेरोजगारी वाढेल आणि जीडीपीमध्ये घसरण होईल, अशी भीती व्यक्त केली होती.  आझाद पुढे असंही म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये घसरण होईल, अशी भीती व्यक्त केली होती आणि आज ती खरीदेखील ठरली आहे.  दरम्यान, यावेळी आझाद यांच्यासहीत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन आणि जदयूचे शरद यादवही उपस्थित होते.  दरम्यान, ८ नोव्हेंबरला काँग्रेसच्या नेतृत्वात १८  विरोधी पक्ष आपापल्या परिनं काळा दिवस पाळून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. ‘नोटाबंदी निर्णय म्हणजे सर्वात मोठा घोटाळा आहे’, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

नुकसान भरपाईची मागणी
मुंबईसह महाराष्ट्रातही नोटांबदी निर्णयाचे वर्षश्राद्ध घालण्यात येणार आहे. दरम्यान, नोटबंदीने नुकसान झालेल्या घटकांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी ८ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. मोर्चेकरी एक निवेदन वाचतील. त्याची प्रत रिझर्व्ह बँक व सरकारला पाठविण्यात येईल. नोटबंदीने उद्योगाचे नुकसान झाले, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. असंघटीत क्षेत्र व शेतीवर देशातील ८५ टक्के लोक अवलंबून आहेत. त्यांना सर्वाधिक फटका बसला. सरकारचे त्याकडे लक्ष वेधणार आहोत. – सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई

बाइक रायडर सना इक्बालचा अपघाती मृत्यू

मुंबई – सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे. तिला तिन वर्षांचा मुलगा आहे.

हैदराबादमध्ये उदारमतवादी मुस्लीम घरात जन्मलेल्या सनाला सातवीपासूनच बाइक चालवण्याचं वेड लागलं. लग्नामध्ये आलेल्या अपयशामुळे आत्महत्येचा विचार घोंघावणाऱ्या सनानं २७ व्या वर्षी बाइक अपघातात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिनं बाइकनं गुजरातपर्यंत प्रवास करण्याचा निर्णय घेतला, एकाच इच्छेनं की तिला ट्रक, टँकर असं कुणीतरी उडवेल. मात्र, या प्रवासात तिला साक्षात्कार झाला की शांततापूर्ण आयुष्य हवं असेल तर ते शांततापूर्ण मार्गानं मिळणं शक्य आहे.

यानंतरचा प्रवास एका वेगळ्याच सनाचा होता, जी निराश झालेल्या युवकांना आशेचा किरण देऊ शकेल. आत्महत्या हा निराशेपासून पळण्याचा मार्ग कसा असू शकत नाही हे युवकांना समजावण्यासाठी पुढे सनानं आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी तिनं भारताची सगळी राज्यं एकटीनं बाइकवरून प्रवास करण्याचा पण केला आणि आत्महत्याविरोधी प्रचार केला. नोव्हेंबर २०१५ मध्ये गोव्यातून सुरू झालेली ही रॅली जूनच्या १६ तारखेला २०१६ मध्ये संपली. १११ शहरं,२९ राज्यं आणि पाच केंद्रशासित प्रदेश बाइकवरून पार करताना तिनं ३८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. १३५ ठिकाणी तिनं सेमिनार घेतले आणि आत्महत्येचा मार्ग न चोखाळण्याचं आवाहन निराशाग्रस्त युवकांना केलं.

बायकर्स कम्युनिटीमध्ये अत्यंत आदराचं स्थान असलेल्या सनाच्या अशा आकस्मिक अपघाती मृत्युमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. आत्महत्येसाठी २७ व्या वर्षी बाहेर पडलेल्या आणि त्यानंतर शांततापूर्ण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या व तीन वर्षांचं मूल असलेल्या सनाचामृत्यू कार अपघातात व्हावा हा एक दैवदुर्विलासच आहे.

‘कंडोम’ जाहिरातीवर अखेर सनीने उघडले तोंड!

नुकत्याच संपलेल्या नवरात्रात पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा फार मोठा टप्पा गाठणारी सनी लिओनी जाम चर्चेत आली होती. विशेषत: गुजरातमध्ये सनीची मोठ मोठी होर्डिंग लागली होती. अर्थात ही होर्डिंग एका जाहिरातीचा भाग होती. जाहिरात होती, कंडोमची. या जाहिरातीच्या होर्डिंगवर सनीचा क्वीवेज दाखवणारा फोटो होता. सोबत होत्या दोन दांडिया स्टिक आणि त्यामध्ये ‘इस नवरात्रि खेलो, मगर प्यार से,’ असे लिहिलेले होते. अर्थात हे वाक्य द्विअर्थी होते. कंडोमच्या प्रचार-प्रसारासाठी वापरतात अगदी तसे द्विअर्थी. मग काय? या जाहिरातीवरून उठायचे ते वादळ उठले होते.

काही हिंदूत्ववादी संघटना सनीच्या या होर्डिंगविरोधात गुजरातच्या रस्त्यांवर उतरल्या होत्या. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या जाहिरातीच्या होर्डिंगविरोधात तीव्र रोष व्यक्त करत, सनीला भारताबाहेर हाकलून देण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावरही सनी व तिच्या या जाहिरातीविरोधात संताप बघायला मिळाला होता. कंडोम विकण्याआधी नवरात्री काय आहे ते समजून घे, असा सल्ला सनीला अनेकांनी दिला होता.

आत्तापर्यंत सगळ्या वादावर बोलणे सनीने टाळले होते. पण ताज्या मुलाखतीत मात्र ती या संपूर्ण एपिसोडवर बोललीच. कंडोम जाहिरातीच्या या सर्व वादाबद्दल विचारले असता सनी जाम वैतागलेली दिसली. ‘तुम्हाला ठाऊक आहे, सेलब्रिटी हे सर्वाधिक सॉफ्ट टार्गेट आहे.   पण खरे सांगायचे तर मला यामुळे काहीही फरक पडत नाही. मला आयुष्य आहे आणि आयुष्यात माझी काही ध्येय आहेत. माझे एक आनंदी कुटुंब आहे. आयुष्यात मला जे हवे होते, ते सगळे माझ्याकडे आहे. त्यामुळे अशा वादांचा माझ्यालेखी काहीही अर्थ नाही,’असे सनी यावर म्हणाली. एकंदर काय तर सनी या वादावर थेट काही बोलली नाही. पण अप्रत्यक्षपणे ती बरेच काही बोलून गेली.

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो- ५ आणि ६ ला मान्यता

मुंबई– मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मेट्रोचं जाळं अधिक विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो ५ व मेट्रो ६ ला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ च्या मार्गाला मान्यता देणयात आली आहे. तर स्वामी समर्थ नगर-जागेश्वरी-विक्रोळी या मेट्रो मार्ग क्र. ६ चा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि त्याच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली आहे.

दुसरीकडे नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-१९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय
– बंद पडलेल्या आणि बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रांचे खाजगी-सार्वजनिक सहभागाच्या (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवन करण्यासह त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहेत.

– राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांना स्थानिक ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजारपेठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

– राज्यात स्विस चॅलेंज पद्धतीने कामे हाती घेण्याविषयीच्या धोरणास मान्यता मिळाली आहे.

– हायब्रिड ॲन्युईटी तत्त्वावर राज्यातील रस्ते व पुलांची सुधारणा करण्याच्या प्रस्तावातील बदलास मान्यता. परताव्याच्या कालावधीत घट, तर शासन सहभागाच्या टक्केवारीत वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.

– पंढरपूर मंदिरे अधिनियम-१९७३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मिळाली आहे.

– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीस देण्याचा निर्णय झाला आहे.

– महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची अंमलबजावणी, निधी उभारणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी एमएसआरडीसीची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

चिल्ड बीअर खिशाला पडणार गरम

मुंबई– विकेण्डला किंवा पार्टीजमध्ये बीअर पिऊन चिल आऊट करणाऱ्यांच्या मजेवर थोडं विरजण पडणार आहे. महाराष्ट्रात आजपासून बीअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बीअरच्या किंमतीत सरासरी तीन ते साडेसहा रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. बिअर पिणाऱ्यांच्या खिशाला काही प्रमाणात झळ पोहोचणार आहे.

महाराष्ट्र सरकारने बीअरवरील अबकारी करात २५ ते ३५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे माईल्ड बिअरच्या ३३० मिलीच्या पिंटची किंमत सरासरी तीन रुपये, तर स्ट्राँग बिअरसाठी ४.५० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरच्या ६५० मिलीच्या पिंटसाठी पाच रुपये, तर स्ट्राँग बिअरची किंमत ६ रुपये ५० पैशांनी वाढणार आहे. प्रत्येक ब्रँडची बीअर वेगवेगळ्या किंमतीला मिळते. येत्या काही दिवसांतच प्रत्येक ब्रँडचे नवीन दर समजणार आहेत.किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईझर या ब्रॅण्डच्या बीअरचे पिंट ६० ते ११० रुपयाला मिळतात. तर बाटलीसाठी ११० ते २३० रुपये मोजावे लागतात.

अबकारी करात वाढ केल्याने बीअरच्या विक्रीतून अबकारी विभागाला मिळणाऱ्या महसुलात सुमारे १५० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. राज्यात वर्षाला ३३ कोटी लिटर बीअरची विक्री होते. गेल्या आर्थिक वर्षात बिअरच्या विक्रीतून १२२८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षात १४ हजार कोटींचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.