नवी दिल्ली : पोलियोग्रस्त धर्मवीर पाल टीम इंडियाचा मोठा चाहता आहे. कित्येक वर्ष तो सामन्यांमध्ये बाऊंड्रीवर बॉलबॉय म्हणून दिसतो. मात्र यापुढे तो बॉलबॉय म्हणून दिसणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. धर्मवीरला आता स्टेडियममध्ये बसून मॅच पाहता येणार आहे.
पोलियोग्रस्त तरुणाला क्रिकेट सामन्यात बॉल उचलण्याचं काम करायला लावल्याबद्दल सोशल मीडियावर टीका झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने परिपत्रक काढून यापुढे धर्मवीरला बॉलबॉयची भूमिका देणार नसल्याचं जाहीर केलं. ‘क्रिकेट हे माझं आयुष्य आहे’ असं धर्मवीर म्हणतो. अनेक क्रिकेटपटूंशी त्याची वैयक्तिक ओळख आहे. २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या सामन्यातही तो बॉलबॉय होता. अंगावर तिरंगा काढून घेणारा सचिनचा सुपरफॅन सुधीर गौतम आणि धर्मवीरची सचिनने भेट घेतली होती. ‘तुमच्यासारख्या चाहत्यांमुळेच आम्ही क्रिकेट खेळू शकतो. भारतीय क्रिकेटला तुमच्यासारख्या फॅन्सची गरज आहे’ असं मास्टरब्लास्टरने त्यांना सांगितलं होतं.
१६ वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणाला बॉलबॉय ठेवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी टीकेची झोड उठवली. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये दिव्यांग तरुणांना बॉलबॉय ठेवू नका, असं सोशल मीडियावर बीसीसीआयला टॅग करुन सांगण्यात आलं.
धर्मवीर हा मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याचा रहिवासी आहे. अवघा आठ महिन्यांचा असताना त्याला पोलियोची लागण झाली. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमध्ये तो टीमचा कर्णधार होता. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी तो ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेशला गेला होता.