चेन्नई | तथ्यहिन लिखाण म्हणजे लेखन स्वातंत्र्य नसून, संपादकीय स्वातंत्र्याचा वापर जनहितासाठी करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिला आहे. सध्या माध्यमांमध्ये फक्त राजकारणासंबंधी बातम्या असतात, पण भारतात नेत्यांशिवाय अन्य बऱ्याच गोष्टी आहेत असेही त्यांनी माध्यमांना उद्देशून सांगितले. तामिळनाडूमधील एका तामिळ वृत्तपत्राच्या ७५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्र आजही महत्त्वाची भूमिका निभावतात. ब्रिटिशांच्या मनातही स्थानिक भाषांमधील वृत्तपत्रांविषयी भीती होती. समाजात बदल घडवण्याचे काम या माध्यमांनी केले. माध्यम विचारांना नवी दिशा देऊ शकतात असेही ते म्हणाले. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. माध्यमांनी त्यांच्या बातम्यांना प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यांनी केलेल्या कार्याची दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सध्या प्रत्येक भारतीय विविध माध्यमांमधून येणारी बातमी खातरजमा करतो. त्यामुळे माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून ठेवण्यावर विशेष भर देण्याची गरज आहे. सक्षम लोकशाहीसाठी माध्यम समुहांमध्ये निकोप स्पर्धा असणे गरजेचे असल्याचे मोदींनी नमूद केले. जगभरात दररोज असंख्य घडामोडी घडतात. यातील महत्त्वाची बातमी निवडण्याचे काम संपादक करतात. कोणत्या बातमीला कोणत्या पानावर स्थान द्यायचे हे देखील तेच ठरवतात. संपादकीय अधिकारांचा वापर जनहितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. जगभरातील नैसर्गिक आपत्तींकडे मोदींनी लक्ष वेधले. पर्यावरणातील बदलासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रांनी विशेष जागा राखून ठेवावी, असे ते म्हणाले. माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना विशेष अधिकार आहेत, मात्र या अधिकारांचा गैरवापर करणे हा गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.