Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशभगवा रंग वैयक्तिक नाही, हिंदू धर्माचं प्रतिक ; प्रियंका गांधींचा योगींना टोला

भगवा रंग वैयक्तिक नाही, हिंदू धर्माचं प्रतिक ; प्रियंका गांधींचा योगींना टोला

Yogi Aditynath - Priyanka Gandhiलखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवी वस्त्र धारण करतात. हा त्यांचा वैयक्तिक रंग नाही तर हिंदू धर्माचा रंग आहे. ज्यामध्ये हिंसा आणि बदल्याची कोणतीही भावना नाही, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगींवर टीकास्त्र सोडलं.

उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहितीचे १४ पानांचे एक पत्रही त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्द केले. पत्रकार परिषेदत प्रियंका गांधी यांनी ही माहिती दिली.

प्रियंका म्हणाल्या, राज्यपालांना आम्ही एक पत्र पाठवले आहे त्यात राज्य सरकार, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अशी काही पावलं उचलण्यात आली आहेत जी बेकायदेशीर आहेत. त्यांच्याकडून उत्तर प्रदेशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सांगताना त्यांनी काही दाखले दिले. त्या म्हणाल्या, बिजनौर येथे सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व आंदोलनात कोणताही सहभाग नसताना दोन तरुणांना पोलिसांनी ठार मारले. यातील एक २१ वर्षांचा सुलेमान जो युपीएससीची परीक्षा देत होता. त्याला पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर त्याच्या छातीत गोळी घातल्याच्या आणि निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तसेच एक तरुण जो कॉफीचे मशीन चालवायचा तो ग्राहकांसाठी कॉफी बनवण्याकरीता दूध आणायला वडिलांना सांगून घरातून बाहेर पडला तर त्याचा मृतदेहच मिळाला. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही मृत तरुणांच्या कुटुंबियांना एफआयआर नोंदवण्यापासून रोखलं तसेच याचे वाईट परिणाम होतील अशा धमक्याही दिल्या. त्याचबरोबर एका ७७ वर्षांच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यावरही अशीच वेळ आली. त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आणि शांततेत आंदोलन करण्याचे जनतेला आवाहन केले होते. मात्र, पोलिसांनी या पोस्टवरुन त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकारामुळे त्यांची ७५ वर्षीय आजारी पत्नी घाबरुन गेली. तसेच दुसऱ्या एका घटनेत आंदोलनाचा व्हिडिओ घेत असताना काँग्रेसच्या एका नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर यांची संपत्ती सरकारने जप्त केली असून अशा ४८ जणांची एक यादी तयार करण्यात आली असून त्यात त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आंदोलनं करणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं आहे. काहींना तर निनावीपणे तुरुंगात डांबण्यात आलं आहे.

राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात या घटनांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच आंदोलनांदरम्यान पोलिसांनी तोडफोड केलेल्या खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे व्हिडिओ देखील सुपूर्द करण्यात आले आहेत. राम, कृष्ण यांसारख्या करुणापूर्ण देवांच्या देशात अशा घटना घडत असल्याचे दृर्देवी असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

या चार मागण्या राज्यापालांकडे केल्या

उत्तर प्रदेश सरकार आणि गृहविभागाकडून प्रशासन, पोलिसांकडून होत असलेल्या गुन्हेगारी कारवाया ताबडतोब थांबवाव्यात.

सेवेतील किंवा सेवानिवृत्त हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या निरिक्षणाखाली शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

चौकशीप्रक्रीया पूर्ण केल्याशिवाय संपत्ती सील करणे, जप्त करणे तसेच इतर दंडात्मक कारवाईला तातडीने स्थगिती द्यावी.

शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची अॅकॅडमिक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments