नवी दिल्ली : आंदोलकांसाठी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे टीकेचे धनी बनललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सावध पावलं टाकली. आंदोलनजीवी शब्दप्रयोगावर टीका झाल्यानंतर आज मोदींनी आदराची भाषा वापरली. राज्यसभेनंतर आज मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. सरकार, संसद, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर करतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकारला आदर : पंतप्रधान मोदी
“आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकार आदर करतं. हे सभागृह आदर करतं, हे सरकारही करतं. कायदा लागू झाल्यानंतरही कुठेही ना बाजारपेठा बंद झाल्या ना एमएसपी बंद झाली, उलट एमएसपी वाढलीय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी राज्यसभेत काय म्हणाले होते?
पंतप्रधान मोदींनी सोमवारी राज्यसभेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. मोदींनी आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकल्याचं म्हटलं होते. त्यानंतर आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी केली.
देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात.
कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.
विरोधकांकडून टीकास्त्र
मोदींनी आंदोलकांना आंदोलनजीवी म्हटल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं होतं. शेतकरी नेते राकेश टिकैत, राजू शेट्टी यांनी स्वातंत्र्याची चळवळ आणि आंदोलनाचा दाखला देऊन, पंतप्रधानांनी या सर्वांचा अपमान केल्याचा हल्लाबोल केला होता.
‘आंदोलनजीवी’ असल्याचा आम्हाला अभिमान, संजय राऊतांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर
‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान’, असे दोन ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटो जोडला आहे.