नवी दिल्ली: नोटाबंदी आणि जीएसटी म्हणजे अर्थव्यवस्थेवरील विनाशकारी अस्त्र असून यामुळे संपूर्ण देशाचे नुकसान झाले अशा अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चांगली संकल्पना आहे, मात्र त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली, असे त्यांनी म्हटले आहे.
जीएसटी आणि नोटाबंदीविरोधात सोमवारी राहुल गांधी यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. काँग्रेसचे महासचिव या बैठकीला उपस्थित होते. तर जीएसटीबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबतही राहुल गांधींनी चर्चा केली. सुमारे तीन तास बैठकींचे सत्र सुरु होते. नोटाबंदीला ८ नोव्हेंबररोजी एक वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाबाबतही राहुल गांधींनी नेत्यांशी चर्चा केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी शेलक्या शब्दात भाजपचा समाचार घेतला. ८ नोव्हेंबर हा दुःखद दिवस होता. केंद्र सरकार नोटाबंदीची वर्षपूर्ती का साजरी करणार हे मला समजत नाही. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला. मोदींना अजूनही जनतेला झालेल्या त्रासाची जाणीव झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
जीएसटीबाबत राहुल गांधी म्हणाले, जीएसटी ही एक चांगली संकल्पना आहे. पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली. नोटाबंदीच्या रुपात अर्थव्यवस्थेवर विनाशकारी अस्त्र डागण्यात आले. यानंतर जीएसटी हे दुसरे विनाशकारी अस्त्र डागण्यात आले. या दोन्ही विनाशकारी अस्त्रांनी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारची कोंडी करण्याची मनसुबे विरोधकांनी रचले असतानाच दुसरीकडे भाजपने हा दिवस ‘काळा पैसाविरोधी दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे.