Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशएक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती?'या' दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

एक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती?’या’ दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला होणार पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

एक सप्टेंबरला सोलापुरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तर पाच सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत हे प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांचे निकटवर्तीय उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांचा देखील भाजप प्रवेश होईल, अशा चर्चा आहेत. दोघेही जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर होते.

एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण इच्छुक असल्याचं कळतं आहे. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत.

चंद्रकांत पाटलांकडून 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत
भाजप-शिवसेनेमधील चर्चेत 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात दिले होते. “युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल,” असं पाटील म्हणाले होते.

जागावाटपाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरेंचा पाटलांवर निशाणा
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेच्या जागांविषयी बोलताना ते म्हणाले की, “युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मिळवून ठरवू.”

परंतु आता भाजपने सर्वच 288 मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्याने, निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments